top of page

औरंगाबाद जिल्हातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे - भाग चार

औरंगाबाद जिल्हातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे - भाग चार

बनोटी, धारकूंड किंवा धारेश्वर आणि सुतांडा किल्ला उर्फ वाडी किल्ला उर्फ नायगांव किल्ला

डाॅ रमेश सूर्यवंशी

अभ्यासिका,

वाणी मंगल कार्यालया समोर ,

कन्नड जि औरंगाबाद


किल्ले अंतूर जर आपण नागद किंवा वडगांव किन्ही असे गेला असाल तर त्याच रस्त्याने पुढे बनोटी हे गांव आहे . गाव मोठे आहे येथे हाॅटेल्स आहेत. या गावाच्या पुढे नदीत गायमूख व जुने असे अमृतेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे बाजूला अनेक देवतांच्या प्रतिमा आहेत . नदी ओलांडून मंदिराचा परिसर लागतो . वडाची झाडे, नदीकडून बोधलेल्या ओट्याला लागून मोठे पाण्याचे कूंड आहे. त्यात दगडाच्या गाईच्या मुखातून सतत पाण्याची धार पडत राहते . वर ओट्यावर विहीरही आहे . विहीरीतून वाहत येणारे पाणी या गोमुखातून पडते. हे पाणी नहरावाटे डोगरावरील किल्यावरुन आणले गेले आहे असा समजही आहे. हे खूप सुदर अस मंदिर पाहिल्या नंतर आपण धारकूंड या निसर्गरम्य अशा डोगरालगतच्या परिसरात जाऊ या !


तेथून पुढे वाडी या गावी जावे लागते .पुढे डोगराच्या दिशने धारकूंड कडे निघावे लागते. धारेश्वर किंवा धारकूंड या स्थळासाठी बनोटीहून वाडी या गावी जाऊन धरणच्या भितीवरुन पुढे नदीतून , शेतातून जावे लागते. परिसर हा खूप निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. विविध प्रकारचे पक्षी ही पहावयास मिळतात. वाहन दूरच ठेवावे लागते .धारकुंड किंवा धारेश्वर म्हणून ओळखले जाणारे हे निसर्गरम्य असे ठिकाण आहे. खूप उंचीवरुन धबधबा कोसळतो. खाली पाण्याच्या उंचावरुन कोसळल्याने खोल अशा विहीरी सारखे कुऺड तयार झालेले आहे.अनेक वेळा पोहणारेआत अडकून मेल्याच्याही घटना झालेल्या आहेत. प्रेतही कपारीत अडकल्याने ब-याचवेळा सापडतही नाही. बाजूच्या भव्य अशा गुहावजा कपारीत महादेवाची पिंड व नंदी आहे . याच ठिकाणी वाकीचे बाबा यांनी तपश्चर्या केल्याचे व त्यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचे एकण्यात आहे. खानदेशातील लोक याला धारकूंड असे म्हणतात.तर सिल्लोड , कन्नड परिसरातील लोक याला

धारेश्वर असे म्हणतात . वर अवघड जागी उंचावर दोन लेण्या कोरलेल्या आहेत मात्र लेण्या उंच अशा उतारावरआहेत. वर चढायला सहजासहजी शक्य होत नाही. परिसर हा निर्जन आहे . एकवेळेस मी व माझे मित्र डॉ. भिलोंडे , आम्ही प्रयत्नही केला. मात्र वेळ सायंकाळची. लेण्याच्या सरळ उंच डोगरावर चढत असतांनाच लेण्यातून वाधाने डरकाळी फोडित समारेच्या डोंगरावर उडी घेतली . आम्हाला परतावे लागले. सुरक्षित राहून जवळचे स्थान म्हणून अवश्य भेट द्यावी





.

औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळाच्या रांगेत अनेक किल्ले, टेहळणी नाके आहेत . त्यांचा शास्त्रीय असा अभ्यास झालेला नाही. दौलताबाद ह्या सुप्रसिद्ध किल्ल्या शिवाय सुतोंडा, वैसागड, लोंजा, पेडक्या, हळद्या, वेताळवाडी या सारखे किल्ले आहेत .

सुतांडा / सायीतोडा/ वाडी किल्ला / वाडीसुतोंडा किल्ला. - हा वाडीसुतांडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो हा किल्ला चाळीसगांव ते सोयगांव या रस्त्यावरील बनोटी या मोठ्या गावापासून तीन किमी अंतरावर आहे नायगांव या गावाला लागून हा किल्ला आहे नायगांव हे नाव या गावाचे असले तरी त्याचे शेजारी ओसाड उजाड गांव होते. व त्या गावाचे नांव सुतोंडा व बाजूच्या गावाचे नांव वाडी या वरुन तो परिसर वाडीसुतांडा म्हणून आळखतात. तेथे जे मोठे धरण बांधले गेले आहे त्या धरणाच्या पूर्वेला नायगांव हे परिसरात परिचित असणारे गांव. तर या धरणाच्या पश्चिमेला धारकुंड हा धबधबा, महादेव व लेण्या असलेले ठिकाण . या दोनही ठिकाणी जाण्यासाठी बनोटी या गावाहून रस्ता आहे . परिसरात मात्र वाडी सुतांडा किल्ला हे नांव जनमानसात प्रसिद्ध नाही .त्यासाठी नायगांव हेच नाव विचारावे लागेत . औरंगाबादच्या गॅझेटमध्ये या किल्ल्याला साईताेंडा म्हटले असून तो कन्नड पासून उत्तरपूर्व दिशेला २६ किमी अंतरावर असल्याची नाेंद आहे. .दख्खनप्रांतावर मुस्लीमांचे राज्य येण्यापूर्वी हा सातोंडा किल्ला कुणी मराठा






राजाने बांधला असावा. काही देशमुखांकडे औरंगजेबने या किल्ल्याबाबत दिलेली सनदही असल्याचा उल्लेख गॅझेटमध्ये दिलेला आहे . मात्र नायगांव (जुने सुतांडा/ सायीतोंडा) हे गांव ६५ ते ७० घरांचे असून३५० ते ३८० लोकवस्तीचे गांव आहे . सगळे लांक शेती व दुग्धव्यवसायकरतात. चौथी पर्यत जिल्हापरिषदेची शाळाही आहे . गावांत प्रमुख गवळी, मराठे असून व इतर जातीही आहेत. डोंगरावरील कन्नड सिल्लोड तालुक्याच्या हद्दीवरील घाटनांद्राचाअवघड व उंच डोगर उतरुन हा किल्ला सहा ते आठ कि मी अंतरावर आहे. मात्र बनोटीहून केवळ तीन किमी अंतरावर असून अलिकडे चांगली सडक बनली आहे.

मुख्य प्रवेशव्दार व तटबंदी ः- वाडी सुतांडा किंवा सायीताेंडा हा किल्ला उंच अशा मुख्य डोंगरात नसून पुढे आलेल्या डोंगर रांगेच्या एका उंच टेकडीवर आहे. मुख्य दरवाजा हा मूळ उंच असलेल्या डांगर रांगांच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडून आहे. (किल्ले अंतूरचाही मुख्य दरवाजा हा दक्षिण मुखीच आहे ) नायगावातून बाहेर पडतांना रस्त्यात झाडाखाली विष्णूची मूर्ती दिसते. गावाबाहेर हनुमानाची मूर्ती, त्याचे जवळ अनेक जुण्या मूत्याऀ आढळतात . पुढे जातांना तुटलेला नंदीही दिसतो . या टेकडावर आईमाई/ मरीआई चे स्थान . येथे पशू बळी दिले जातात . नायगांवकडून , दक्षिणे कडून आल्यावर संपूर्ण गोल टेकडीचा भाग ओलांडून मागच्या अध्याऀ डांगरातून मुख्य दरवाजा दिसतो. मूळ डोऺगर रांगेचा उंच असा भाग कापून टाकून मोठा खंदक तयार केलेला आहे. या खंदकाच्या उत्तरेकडील



उंच खडकात मुख्य दरवाजा हा कोरलेला आहे. त्या समोरचा दक्षिणेकडीलउंच कडा हाही सलग अशा डोगराच्या उंचीचा खडकाचा आहे. या उंच डोगरातूनही कुणी शत्रू या किल्ल्याकडे येवू शकणार नाही अशी कड्याची उंची आहे .इतर किल्ले हे कुठेतरी बांधकाम केलेल्या तटबंदीला लागून असलेल्या मजबूत बांधकामात भलीमोठी चौकट बसवून फळया लावलेल्या दिसतात . मात्र या सुतोडा किल्ल्यावर कोणत्याही बांधकामात हा मुख्य दरवाजा नाही. तर तो खडकात, उंच कड्याच्या तळाशी कोरलेला आहे. आत जाणारा त्या खडकाच्या दरवाज्यात उत्तरेकडे तोड करुन जातो तोच त्याला त्या खडकातील मंडपाच्या उजव्या बाजूला पूर्वेकडे तोंड करुन व पुन्हा उत्तरेकडे वळून खडकांतील भुयारी मागऀतून वर किल्ल्यावर निघावे लागते .या मागाऀत शिरलेल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैन्याला लपून बसण्यासाठीच्या जागाही आहेत. या मुख्य प्रवेश द्वाराच्या उंच या कडया वरील खडकांवर बांधकामांसाठी चुनावगैरे न वापरता दगडावर दगड रचून उंच अशा भिंती उभारलेल्या आहेत. उंत्तरे कडील सुतांडा गावाच्या दिशेने ब-याच




अंतरापर्यतचीनैसगिऀक कड्याची तटबंदी तर आहेच . त्या शिवायही दगडांवर दगड रचून केलेली दगडांची तटबंदी अजूनही सुरक्षीत आहे . या किल्ल्याला तीनही बाजूने नैसर्गिक उंच कडा आहेत.तर दक्षिणेकडूनमुख्य डोगर रांगेची सलगता ही खोल खंदकाने तोडलेली आहे. उत्तरेकडील (गावाच्या दिशेकडील) लहान दरवाजा हा दगडाचे चीरे एकावर एक रचून तयार केलेला आहे . हा दरवाजा लहान असून त्यातून माणसांनाच प्रवेश करता येईल असा सामान्य दरवाजाप्रमाणे पाच फूट एवढाच तो उंच आहे. भैागोलिक वैशिष्ट्यं पाहता हा अजिंठा डोंगर रांगेतील गिरीदुर्ग समुद्र सपाटीपासून १८०० फूट उंचीवर आहे. दक्षिणेकडील डोंगर उताराचा संपूर्ण पहाड कोरुन मोठी खंदकवजा खिंड किंवा खाच तयार केली आहे. त्या खाचेत उत्तरमुखी दरवाजा कोरलेला आहे हा सगळा दगड फोडून त्याचे चिरे तटबंदीसाठी वापरलेले दिसतात या खाचेच्या दोनही बाजूंना उंच तटबंदी व बुरुज आणि समोरच्या बाजूला खोल दरी तर मागील बाजूला अरुंद पाय-या शत्रूला कोडीत पकडणारा असा हा मार्ग या खि्डीच्या आत गेल्यावर १२ फूट उंच दरवाजा कोरलेला आहे. तर दरवाजाच्या वर जेथे मजबूत खडकाचा भाग संपतो तेथे उंच तटबंदी बांधलेली आहे. या तटबंदीच्या डाव्या बाजूला शरभशिल्प कोरलेले आहे. उजव्या बाजूला तोफेने मारा करण्यासाठी झरोका ठेवलेला आहे. खडकातून कोरलेल्या या दरवाजातून आत गेल्यावर तो भुयारी मार्ग काटकोनात वळतो. आत पहारेक-यासाठी ओटे आहेत. या खडकातील भुयारीवजा खिंडीतून पुढे गेल्यावर वर चढून जाता येते.

उत्तरेकडील पाण्याची टाकीः- या मागच्या लहान दगड रचून तयार केलेल्या या दरवाज्याच्या बाहेर त्या अवघड अशा डाेंगर कडांवर तीन चार मोठे पाण्याची टाकी आहेत काही टाकी मातीखाली दबून झाकली गेलेली आहेत त्या टाक्यांमध्ये लेण्या कोरण्याचाहीप्रयत्न झालेला आहे या टाक्यांच्या भिंतीत मूर्ती कोरलेल्या आहेत मूर्तीच्या डोक्यावर काही चित्रेही कोरलेली आहेत. या टाक्याला दगडाचे कोरीव प्रवेश द्वार असून त्या दगडांच्या चौकटीवरही नक्षीकाम कोरलेले आहे. या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत . या लेण्यांच्या वा लेणीवजा असणा-या पाण्याच्या टाक्यांतील सगळे खांब हे सुद्धा नक्षिकाम केलेले आहेत. याला स्थानिक जोगवा मागणारीचं लेणी असेही म्हणतात. हे जैन लेणी आहे . यातील पहिल्या लेणीत दोन दालने आहेत. बाहेर दोन खांब आहेत. दारावर महाविराची प्रतिमा दिसते. उजव्या दालनात मांडीवर मूल घेतलेल्या स्त्रीची प्रतिमा आहे. वरच्या भिंतीवरही महाविराची प्रतिमा, गधवाऀची मूर्ती कोरलेली दिसते. दुस-या दालनातही नक्षीकाम आढळते. लेणी लगत बसण्यासाठी दगडात कोरलेला बाक आहे. या




मूत्याऀ साधारणतः दोन ते अडिच फूट उंचीच्या आहेत. त्या चढून वर गेले तर नायगांवकडे तोड असलेला लहान दरवाजा जो दगडांचे चिरे एकावर एक ठेवून केलेला आहे तो दिसतो. हा चोर दरवाजा. ही वाट चढणीची व अवघड आहे. बहुतांश मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांची रचना ही कोरलेल्या लेण्या प्रमाणेच आहेत. मुख्य प्रवेश द्वार व मागचे लहान दार या शिवाय तटबंदीला लागून इतर दरवाजे नाहीत. मात्र या मागच्या लहान दरवाज्यातूनप्रवेश केला व वर थोडे अंतर चढून गेले तर एक उंच पडकी अशी रेखीव पण दोनकालखंडात बांधकाम केलेली कमान व दगाऀ दिसतो. त्या शेजारी आपल्याला आधी दर्शन होते ते पाचपन्नास अशा पाण्याच्या कोरीव टाक्यांचे. त्यांचा वरचा सगळा भाग हा उघडा असून मोठमोठ्या हौदां प्रमाणे ते दिसतात . या सलग असलेल्या उघड््या हौदा प्रमाणे असलेल्या पाण्याच्या टाक्यांची विशिष्ट अशी रचना आहे . मोठमोठी हौदा सारखी ही टाकी सलग एका रांगेत आहेत. त्या शेजारी दुसरी थेाड््या आकाराने लहान असलेल्या हैादांची रांग आहे. तीला लागून तीसरी हौदांची रांग ही मोठ््या तोडांच्या रांजणाच्या आकाराच्या हौदांची आहे . म्हणजे या तिस-या रांगेतून हत्ती, घेाडे यांनाही पाणी पिता येईल. अशी दिसते किंवा तीस-या टप्प्यातील् ही रांग तिस-यांदा पाणी गाळून पुढे सरकलेले असल्याने ते अधिक स्वच्छ आढळते. मात्र हा सलग पाचशे ते हजार फूट लांबीच्या या पाण्याच्या दगडी हौदांच्या तिहेरी रांगेच्याही खाली या डोगराच्या उर्वरीत तीनही बाजूने पाण्याची मोठमोठी लेणीवजा बंद टाकी आहेत.

दक्षिण दिशेला असलेली पाण्याची टाकी ः- त्या पैकी किल्ल्याच्या दक्षिण भागात असलेल्या दगडी टाक्यांचे तिन मजले आढळतात. अशी तीन रांगेत असलेली ही पाण्याची एकूण टाकी या किल्ल्यात पंचावन्न आहेत . प्रत्येक पाण्याच्या या लेणीचे (टाक्याच्या) छतावरुन पुढे गेले तर आपण दुस-या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत घुसतो, तसेच वर चढून पुन्हा तिस-या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत शिरतो . अशी ही पिण्याच्या पाण्यांच्याटाक्यांची ( की कोरीव लेण्यांची ?) तिनस्तरीय रचना किल्ल्याच्या दक्षिण भागाला दिसते . या पाण्याच्या लेणीवजा टाक्यांत मोठमोठ्या कोरीव खांबांच्या १५ ते २० फूटांरील अशा तीन तीन रांगाही आढळतात . या एका रांगेतील खांबांची संख्या ही एक, दोन पासून ते ती आठ,दहा पर्यत लेणी निहाय आहे. दोन दगडी खांबांमधील अंतर हे लेण्याच्या आकारानुसार पाचफूटा पासून ते विस फूटांपर्यत आढळते . मोठ्या पाण्याच्या टाक्यांना बाहेरच्या कडांना लागून पाय-याही आहेत त्या पाय-यांनी पाण्यापर्यत जावून पाणी घेता येते. खूप मोठा परिसर व्यापणा-या काही टाक्यांना दगडांच्या कडांवर खिडक्याही कोरलेल्या आहेत. ही मोठी टाकी खोलीला कमी ( पाच पासून वीस फूट )असली तरी ती लांबीला व रुंदीला ( दोनशे ते चारशे फूट ) ती भरपूर मोठी आहेत. दक्षिणेकडीलया पाण्याच्या टाक्यांचे पाणी अतिशय थंड व चांगल्या गोड चवीचे आहे. या टाक्यांचे पाणी साधारणतः चार ते पाच ठिकाणी गाळून आलेले असते. या सगळ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पाझरुन आत आणणारे काही हिरवट रंगांचे ढिसूळ अशा नहरवजा खडकांच्या रेषा उपयुक्त ठरतात ,असे काही ठिकाणी आढळते. खडकांत असलेल्या या हिरव्या खडकांच्या रंगीत रेषा पावसाच्या पाण्यामुळे अधिक ढिसूळ बनून तेवढा हिरव्या दगडाचा भाग बाजूला गळून जावून तो नहराचे वा पाण्याच्या चारीचे काम करतो असेही आढळते .

पुवे कडील पाण्याची टाकीः- या सुतांडा किल्याच्या पूवेऀ दिशेला काही मोठी लेणीवजा टाकी आहेत. काही ठिकाणी दोन तीन टाकी - लेण्या - ह्या सलग असल्या तरी एकातून दुस-या टाक्यात ठराविक उंचीवरुन पाणी जावे असे दगडाला मोठे नक्षीदार छिद्र कोरलेले आढळते. दोन टाक्यांमध्ये अखंड दगडाची ( टाकी कोरतांनाच ) भिंत तयार केलेली दिसते. अशा भितीची सहा ते बारा इंचाची जाडी ठेवलेली दिसते. दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या एका मोठ्या टाक्यात पाच ते सात खांबांची आडवी रांग ( पसरट) व चार खांबांची उभी (आत खेाल होत जाणारी ) रांग आहे. तीस-या खांबा पर्यत दोन ते तीन फूट पाण्यातून चालत गेले तर तेथे दक्षिणेकडील दगडाच्या भिंतीत अंधारात पाण्यातून किंचीत वर असलेली गुप्त खोली आहे. ती कोरडी राहते, पाण्याचा अंशही तेथे नसतो. शत्रू पासून लपून बसणे किंवा धनदौलत लपवून ठेवणे या कामांसाठी ती वापरीली जात असावी. असल्याच प्रकारची काही टाकी याच डोगर रांगेत असणा-या पेडक्या या किल्ल्यात (कळंकी, ता कन्नड जि औरंगाबाद) आढळते. तेथेही या पाण्याच्या टाक्यात असले चोर कप्पे आढळतात.



टाक्यातील दगडांचा वापर ः- ही टाकी कोरतांना दगडांचे जे उभे चीरे काढले आहेत ते सगळे चीरे एकावर एक रचून तटबंदीच्या भिंती तयार केलेल्या आहेत . मागील लहान दरवाजाही तसल्याच चि-यांचा आहे. समोरच्या कड्यात कोरलेल्या मुख्य प्रवेश व्दारावरही वरच्या उंच भिंतीच्या उभारणीसाठीही असलेच दगडाचे मोठमोठे चिरे वापरलेले आहेत . (असली टाकी कोरुन बनविलेल्या तलावाच्या चौफेरच्या भिती व पाय-यांसाठी असा चि-यांचा वापर याच डोगरातील गौताळा तलावावर केलेला आढळतेा. कन्नड पासून १० कि मी )

तसेच किल्ले अंतूरच्या तलावा जवळील दगाऀच्या वरचा समोरील किंवा किल्ल्याच्या दुस-या प्रवेश व्दारा जवळची खोली समोरील दर्शनी भाग यावर फसविलेल्या तिरकस अशा चापट दगडांच्या तिरकस ठेवलेल्या तळ्यात ( पावसाचे पाणी आत येवू नये म्हणून ठेवलेल्या दारावरील तिरप्या पत्रांप्रमाणे ) यांची रचना पाहता त्या रचनेशी जुळणारी रचना या सुतांडा किल्ल्याच्याभव्य पडक्या कमानीच्या वर लावलेल्या दगडांच्या रचनेशी जुळतांना दिसते. ते काम व तटबंदीच्या काही भागांचे काम हे जर १५व्या किंवा १६व्या शतकातले असेल तर उत्तरेकडील मूतीऀ असलेल्या लेणीवजा कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा काळ हा चौथ्या पाचव्या शतकात घेवून जाईल असे दिसते. ( अथातऀ हा इतिहासाच्या संशोधनाचा विषय आहे )

वैशिष्ट्ये ः- किल्यात किल्ला म्हणून असे कोठार घरे, तोफा, भूयारे असे काहीही आढळत नाही मात्र कोणत्याही किल्ल्यात नसतील एवढी पाण्याची टाकी येथे कोरलेली आहेत तीही अनेक मजली लेण्या वजा ती पाण्याचीच टाकी म्हणून कोरली की लेण्या कोरलेल्या होत्या व त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने पुढे किल्ला बनून ती पाण्याची टाकी म्हणून वापरली गेलीत?

जर ती किल्ल्याची पाण्याची टाकी म्हणूनच कोरली गेली असतील तर वाॅटर काॅझवेऀशनचा, वाटर मॅनेजमेन्टचा महाराष्ट्रातीलतो एक उत्कृष्ट नमुनाच आहे. शे पन्नास पाण्याची टाकी, तिनचारवेळा फिल्टर होवून येणारे पाणी, दुष्काळातहीटिकणारे पाणी! प्रश्न पडतो की हा किल्ला भव्यही नाही, मात्र एवढी पाण्याची टाकी का कोरलीत? कोणत्याही मोठ्या किल्ल्यावर एवढी पाण्याची टाकी नाहीत. पाण्याची इतकी गरज कुठेही आढळलेली नाही. मग येथे एवढे पाणी का साठविले? अशी आख्यायाीका आहे की, या किल्ल्याच्या एका हौदात टाकलेला निंबू पाण्यावर तरंगत वाहात जावून तो आठ ते दहा किमी असलेल्या बनोटीच्या नदीकाठावरीलमहादेव मंदिराच्या जवळील गो मुखातून बाहेर पडतो. असे जर असेल तर आपल्या राज्यात तत्कालीन राजाने वा किल्लेदाराने असला पाणी पुरवठा नहरा व्दारे कुठे कुठे केलेला होता ? हा ही संशोधनाचा विषय ठरेल .

या किल्ल्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की हाचे मुख्य प्रवेशव्दार हे खडकाच्या उंच कडयातून कोरलेले आहे व सगळीकडे दगडाचे चीरे हे चुण्याचा वापर न करता एकावर एक बसविलेले आहेत. या किल्ल्यात ज्या काही दगडात कोरलेल्या लहान खोल्या आहेत त्या वाघाच्या खोल्या म्हणून ओळखल्या जातात. पाळीव वाघ या खोल्यात कोंडून ठेवित असत अशी आख्यायीका आहे. या किल्ल्यात हत्ती वावरु शकेल अशी मुख्य प्रवेश द्वाराची व पाय-यांची वा रस्त्याची रचना वाटत नाही. फार तर घोडेस्वार सहज फिरु शकेल अशी ती रचना आढळते विशेष म्हणजे किल्ल्यावर वापरता येयील अशी सपाट जागा वा मैदानही नाही. कुठे भयारे वा भुयार घरे ही असू शकत नाही कारण चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे की लेण्यांचे थर आहेत. व या लेण्याच्या थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू हीच काय सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका होत गेलेला आहे. वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंतीच आहेत असलाच तर मोठा कोठारघरावजा भाग असेल पण तोही काही खूप भव्य वाटत नाही. त्यामुळे त्या ठिकाणची टाकी, उत्तरेकडील लहान दगड रचून केलेले द्वार दक्षिणेकडीलकडा कोरुन कोरलेले मोठे प्रवेशद्वार आणि मध्यभागी बांधलेले भव्य, उंच अशी कमान ह्यांचा बांधकामाचा काळ एक वाटत नाही . या सर्व कोरलेल्या टाक्यांचा काळ व या इतर बांधकांमाचाकाळही एक वाटत नाही. मात्र तो परिसर हा वैभव संपन्न असावा. याच डोगराला लागून खाली बाजारपट्ट्याच्या ओट्याच्या खूणा आहेत, पैय्ये आहेत. या परिसरात हत्ती व घेोडे खरेदीसाठी मोठा बाजार भरत असे अशी आख्यायीका आहे .

मग हा किल्ला आहे की, कोरलेल्या लेण्याचं रुपांतर पुढे किल्ला बनवून या वस्तीसाठी झाला? जंगल कुरणांनी वैभव संपन्न अशा भागात या मोठ््या बाजारपेठेसाठी हत्ती, घोडे पुरविणा-या श्रीमंत व्यापाराची ही जनावरे सांभाळण्याची व राहण्याची तर जागा नसावी ना? आपली जनावरे, वैभव संपन्नतेवर हल्ला होवू नये म्हणून किल्लेवजा तटबंदी त्यानेच तर केली नसावी ना? आपल्या जनावरांसाठीवर्षभराचे पाणी साठविण्यासाठीचही एवढी टाकी कोरली नसतील ना? कि एखादा श्रीमंत सरदाराचे येथे वास्तव्य होते? की जुन्या दक्षिणपथाच्या व्यापारीमागाऀ वरील हे एक थांब्याचे ठिकाण होते? अशीही शंका येते.

आपणाला अजूनही पर्यटन करावयाचे असेल तर याच रस्त्याने पुढे सोयगांव किवा जरंडी हून आपणाला घटोत्कच उर्फ घटोर लेण्या, जंजाळा किल्ला, वेताळवाडी किल्ला , राणीकी बाग, अन रुद्रेश्वर लेण्या पहाता येतात. थाबण्यासाठीसोयगांव किंवा फदाऀपूर हे जवळचे ठिकाण . हे पाहून आपण हळद्या घाटातून डोगराच्यचा वरच भागातील अंभई, मुडेश्वर, जागेश्वरी, इंदगढी या पर्यटन स्थळी जाता येईल .

डाॅ रमेश सूर्यवंशी

अभ्यासिका,

वाणी मंगल कार्यालया समोर ,

कन्नड जि औरंगाबाद

संपर्क - ८४४६४३२२१८

51 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने असऺ किंवा नोकरी असताना मग डाळ घेऊन जा. ज्वारी घेऊन जा. गहू घेऊन ज

bottom of page