प्रांजल आणि शरणांगत या कादंबरीची समीक्षा लेखक सोनवणेWritten by,
Bharat Sonwane .Reference -
गेले बरेच दिवस 'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती' या दोन कादंबऱ्या वाचण्याच्या विचारात होतो पण योग काही जुळून येत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात या दोन्ही कादंबरींबद्दल थोडक्यात सारांश कळाला. मग या दोन्ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता, आतुरता अजूनच वाढली. दोन दिवसांपूर्वी अखेर या दोन्ही कादंबरी मिळवल्या आणि यासोबतच अजून एक कादंबरी असे एकुण तीन कादंबऱ्या तीन दिवसात वाचून संपवल्या. दोन्ही कादंबऱ्या फार अश्या मोठ्या नाहीत, एकूण १२५-१२५ पानांच्या या दोन्ही कादंबऱ्या आहेत. त्यामुळे आपण सहज वाचून संपवतो. कादंबरीच्या आतील लेखन त्यातील घटनाक्रम हे सर्व लिखाणात कैद करणारे लेखक 'डाॅ.रमेश सुर्यवंशी सर Ramesh Suryawanshi ' ओळखीचे,जवळचे असल्याने हे सगळं वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या गप्पांच्या माध्यमातून ऐकून होतोच आणि त्यामुळे एक अनामिक उत्सुकता लागून होतीच. काल सायंकाळी या दोन्ही कादंबऱ्या वाचून संपवल्या अन् मनात वाटून गेलं की याबद्दल आपण लिहायला हवं आहे. तर 'प्रांजल' ही १२५ पानांची कादंबरी आपल्याला लेखकांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडून दाखवणारी आहे. नकळत्या वयात वडिलांचं सोडून जाणं, घरी असलेलं अठरा विश्व दारिद्य्र, आईनं केलेलं काबाडकष्ट. मामांच्या घरी राहून लेखकांनी घेतलेलं शिक्षण, मग पुढे शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठीचा सरांचा संघर्ष. कित्येक वर्ष अवघ्या महाराष्ट्रात नोकरीसाठी त्यांची भटकंती, कुठेही, कोणत्याही महाविद्यालयात नोकरी मिळवायला गेलं की बॅकलॉग शिक्षक पदावर मिळणारी सरांची नोकरी, दरवर्षी तीच मुलाखत, तेच वेग-वेगळे महाविद्यालये. अन् जाती व्यवस्थेमुळे बरबटलेली महाविद्यालयातील संस्थाअध्यक्ष,मुख्याध्यापक,तेथील स्टाप यांचा सरांना झालेला त्रास. या प्रवासात सरांना मिळालेली काही चांगली माणसे, पुढे चालून आपल्याच घरातील कौटुंबिक कलह अश्या अनेक विषयांना घेऊन रेखाटलेली 'प्रांजल' ही कादंबरी आजच्या व्यवस्थेशी दोन शब्द करू बघणारी आहे. जी आपण नक्कीच वाचायला हवी आहे. 'शरणागत् प्रपत्ती' ही सरांची दुसरी कादंबरी खूप अनोखी अन् काळजात घर करणारी आहे. यात घडलेल्या काही घटना या काळाच्या सुसंगत अन् चालू काळाशी मिळत्या-जुळत्या असल्याने कादंबरी खूप जवळची अन् वास्तवाला भिडणारी भाष्य करू बघणारी आहे हे कळून येतं. जेव्हा जेव्हा वास्तवावर, चुकीच्या गोष्टी चुकीच्या आहे हे कुणी सामान्य माणूस समाजाला पटवून देतो तेव्हा त्याच्यासमोर काही अतीसामान्य माणसे त्यांना कसे त्रास देतात अन् त्यांचा कसा कायमचा काटा काढायचा प्रयत्न करतात. हे सांगू बघणारी ही कादंबरी आहे. एकाच घटनेतून अनेक पदर उलगडू बघणारी, ज्यामुळे तिच्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल. ती आपल्याला वाचूनच समजेल अशी ही कादंबरी आहे. विश्वास पाटील मास्तर, सूर्या अण्णा, पथव्या, दगड्या, युसुफ, सर्जा तांगडे, मल्या, हौसा, द्वारकानाथ, आमदार तुका पाटील, पिरोजी, सोमु, देशमुख, भिजवाय, धनबोले, वडगांवकर, डॉ शिवदास पाटील, देवड्या, ॲड.भोसले अश्या अनेक पात्रांच्या समवेत घडणाऱ्या घटना या कादंबरीत लेखकांनी कैद केल्या आहेत. थोडक्यात लेखकांच्या लेखणीतून या कादंबरीबद्दल जाणून घेऊया आणि थांबूया. 'शरणागत् प्रपत्ती' प्रस्थापित हे सर्व दडलेले आहेत, छुप्या स्वरूपात ! तुमच्यात, आमच्यात, गावागावांत, प्रत्येक कार्यालयात, शासनात आणि सर्वच समाजात मग तर आदिवासी असोत की दलित बहुजन. आदिवासींच्या उत्थापनात अडथळा आहे तो या प्रस्थापितांचा ! आदिवासी आणि प्रस्थापित यांचा हा लढा आहे. वर्ग कलह आहे ! आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी,शासनाने दोन एकर जमीन त्यांनी दिली तर आपल्या शेतात कोण राबेल ? त्यांना आवास, सवलती, शिष्यवृत्ती, कर्ज, दिली तर आपणाशी ते बांधील कशासाठी राहील. दोन रुपये कील गहू किंवा तांदूळ मिळत असतील तर तो रोज आपल्या शेतात का म्हणून राबेल ? एका दिवसाच्या अडीचशे-तीनशे रुपयाच्या मजुरीवर महिनाभराचे शंभर-दीडशे किलो धान्य नाही भरणार,आदिवासींची पोरं शिष्यवृत्तीच्या जोरावर शिकून सवरून आरक्षणाचा फायदा घेत वरच्या पदावर नोकरीला जातील अन् आपली पोरं ? ना शिष्यवृत्ती, ना आरक्षण, ना नोकरी ! ना दोन रुपये किलो गहू आणि तांदूळ ! आपली पोरं आपल्या शेतात राबतील तेही भाव नसलेल्या उत्पादनासाठी ! असे एक न अनेक प्रश्न या प्रस्थापितांच्या कुच्चर ओट्यावर सदा चर्चिले जातात अन् यातून सुरू होतो या आदिवासींसाठीचा साठमारीचा खेळ. प्रत्येकातला हा प्रस्थापित जागा होतो अन् पेटतो संघर्ष, चौफेरून सुरू होते नाकाबंदी, या आदिवासींची ! अन् ते बनतात 'शरणागत, अन् त्यांना पत्करावी लागते शरणागती प्रपत्ती ! या जळजळीत सत्यावर प्रकाश टाकला आहे,'डॉ रमेश सुर्यवंशी' यांच्या 'शरणागत् प्रपत्ती' या कादंबरीतून. नक्की वाचायला हवी अशी ही कादंबरी. Written by, Bharat Sonwane . My Blog link, http://bharatsonwane.blogspot.com/2022/10/blog-post.html
댓글