top of page
Writer's pictureDr.Ramesh Suryawanshi

डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्या विषयी

Updated: Oct 5, 2022

By -- B. N. Chaudhari .Dharangain,

आहिराणी बोलीचा शब्दकोष,

ज्यांनी संशोधनातून सिध्द केला,

त्याच डॉ. रमेश सुर्यवंशींनी,

माझा "खान्देश भूषण"ने गौरव केला.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

अत्तर क्षणांचा सुगंध / १५ /

प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३.

समाजामध्ये काही माणसं फक्त स्वतःसाठी जगतात. काही माणसं ही आपल्या कुटुंबापुरती जगतात. काही माणसं ही घरदार सोडून विरक्त होवून, संन्यासी होतात तर काही माणसं ही समाजाची होवून समाजासाठी जगतात. स्वतःसाठी, कुटुंबासाठी किडे, मुंगेही जगतात. विरक्त होवून अनेक साधू पुरुष वणवण जगभर फिरतात. यासाठी फार काही करावं लागत नाही. मात्र, घर उत्तम पध्दतीने सांभाळून समाजासाठी जगायला खूप काही करावं लागतं. इमानदारी, सचोटी, काटकसर, त्याग, कष्ट, सातत्य आणि समर्पण यांचा सुयोग्य मेळ जमतो, तेव्हा एखाद्याच्या हातून समाजोध्दाराचं कार्य घडून येतं. खान्देशातील सुपूत्र आणि मराठवाड्यातील कर्मयोगी डॉ. रमेश सूर्यवंशी हे असेच एक समाजसेवक आहेत. त्यांनी आपल्या मातृभूमीचं, मायबोलीचं ऋण फेडण्यासाठी आहिराणी बोलीतून संशोधन करुन, अत्यंत महत्वाची अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांचे आहिराणी शब्दकोश, आहिराणी म्हणी आणि वाक्प्रचार तसेच खान्देशातील सचित्र कृषक जनजीवन हे ग्रंथ म्हणजे खान्देशचा सांस्कृतिक ठेवा आहे. जोडुनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी. असं संत तुकाराम महाराज म्हणतात. सन्मार्गाने धन जुळवून, त्याचा उत्तम व्यवहारासाठी उपयोग करावा. विचारांमध्ये परिपक्वता आणून, जीवन व्यतीत करावं. या उक्तीवर डॉ. सूर्यवंशी यांचं जगणं बेतलेलं आहे. असा हा समाजप्रबोधक माझ्या लोकसंख्या विस्फोट व्यंगचित्रात्मक प्रदर्शनाच्या रुपाने माझ्याशी जुळला. माझा शब्दमित्र झाला. त्यांच्या साधना, संशोधनाने ते कधी माझा गुरु झाले, ते मलाही कळलं नाही. नुकताच त्यांच्याच हस्ते मला वापी (गुजरात) येथे आहिराणी भाषेतील माझ्या योगदानाबद्दल "खान्देश भूषण" पुरस्कार बहाल करण्यात आला. तो माझ्या जीवनातला एक अत्तर क्षण बनून गेला. आपलं अवघं आयुष्य ज्या माणसाने आहिराणी बोली संशोधनात घालवलं, त्यांच्याच हस्ते आपला गौरव होणं, याहून मोठा आनंद नाही. हा आनंद ज्यांनी मला दिला त्या सौ. सुनिताताई पाटील (नाशिक) आणि संग्रामसिंह राणा (वापी) यांचा मी ऋणाईत झालो आहे. वापीतला हा अत्तर क्षण, माझं उर्वरीत आयुष्य सुगंधी करुन टाकायला पुरेसा आहे. या क्षणाने डॉ. सूर्यवंशी आणि माझ्यातील नात्याला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

९० च्या दशकात, मी स्वतःला लोकसंख्या शिक्षणणाच्या कार्याला वाहून घेतलं होतं. माझ्या या व्यंगचित्र प्रदर्शनाची माहिती, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सूर्यवंशी यांना कळाली. त्यांनी त्यांच्या कन्नडच्या महाविद्यालयात प्रदर्शनासाठी मला आमंत्रित केले. मी आनंदाने त्यांचं निमंत्रण स्विकारलं. प्रदर्शन भरवलं. विद्यार्थ्यी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रदर्शन कमालीचं यशस्वी झालं. सरांनी एक कार्यक्रम घेवून माझा उचित सत्कार केला. घरी आग्रहाने पाहुणचार केला. ओळख ना पाळख, तरी आम्ही आमच्या सामाजिक कार्यामुळे एकत्र आलो. जुळले गेलो. मित्र झालो. आपलं काम करत असतांना, समाजाचं आपण देणं लागतो. समाजासाठीही काही केलं पाहिजे. हा विचार आमच्यातला बंध झाला. तो पुढे दृढ होत गेला.

सूर्यवंशी सरांनी आपल्या स्वभावानुसार पुढे स्वतःला, खान्देशी संस्कृती आणि बोली भाषा यात गुंतवून घेतले. एकदा मी आखाजी निमित्ताने आमच्या घरी झालेल्या पूजेचे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध केले. ते सरांना मोलाचे वाटले. त्यांनी त्यांच्या संशोधनात्मक लेखात, ते चित्र लोकप्रभाला प्रसिद्ध केले. मला लेखही पाठविला. ही त्यांची गुणग्राहकता. ते कुठेही गेले, म्हणजे सोबत एक वही ठेवतात. तिवर ते त्या भागतील बोलीचे संवाद, शब्द, म्हणी, वाक्प्रचार, चालीरीती, अवजार, भांडी यांच्या नोंदी टिपून घेतात. घरीगेल्यावर त्याचे वर्गीकरण करुन, आपला संग्रह वाढवतात. यातून त्याचं संशोधन पूर्ण झालं आहे. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला शासकीय, विद्यापीठीय आणि संशोधनात्मक दृष्ट्या मान्यताप्राप्त झाली आहे. त्यांच्या संशोधनामुळे खान्देशातील ठाकर समाजातील लोकांना जात प्रमाणपत्रे मिळाली. त्यांना हक्क, शिक्षण, नोकऱ्या, अनुदान मिळाले. यासाठी त्यांना लढावे लागले. संघर्ष करावा लागला. हा संघर्ष त्यांच्या जीवावर उठला होता. संसार उध्वस्त होवू शकला असता. त्यांना चूकीच्या पध्दतीने अटक झाली. अनेक कलमं लावली गेली. मात्र, ते डगमगले नाही. भिडले, लढले आणि विजयी झाले. याच काळात त्यांनी शासनाला दाखल केलेले संशोधनात्मक काम डॉ. गोविंद गारे या एका आयएएस अधिकाऱ्याने हडपले. त्यावर त्याने परस्पर, स्वतः पुस्तक छापून घेतले. ते डाॅ. सूर्यवंशी याना कळले. तेव्हा त्यांनी काॅपी राईट ॲक्टची केस टाकून, त्या अधिकाऱ्याला उघडे पाडले. माफीनामा लिहून घेतला. तेथेही ते विजयी झाले.

वापीच्या आहिराणी साहित्य संमेलननाच्या निमित्ताने, नात्याच्या बंधावर बसलेली धूळ झटकली गेली. आहिराणी लोकसाहित्यावर यापूर्वी डॉ. दा. गो. बोरसे, यांनीही मौलिक संशोधन प्रसिद्ध केले आहे. ते मला मिळेल कां म्हणून मी सरांना फोन केला. त्यांनी तात्काळ होकार भरला. मात्र, त्यासाठी घरी भेट देण्याची अट त्यांनी घातली. मीही सत्वर तयार झालो. त्यासाठी, मित्र रमेश धनगर, एकनाथ गोफणे व समाधान सोनवणे आम्ही एकत्र कन्नड गेलो. एका कर्मयोग्याला, त्याच्याच कर्मभूमीत भेटलो. संवाद साधला. मनसोक्त चर्चा केली. सौ. मीनाताईंनी खापरावरची पुरणपोळी आणि आमरसाचा आग्रहपूर्वक पाहूणचार केला. मनाची आणि पोटाची तृप्तता झाली. एक वेगळंच समाधान या स्नेहभेटीत प्राप्त झालं.

डाॅ. रमेश सुर्यवंशी यांचा जन्म १ जून १९५६ रोजी शिंदाड ता. पाचोरा जि. जळगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. बालपण व प्राथमिक शिक्षण खान्देश व मराठवाड्यात तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा व नागपूर विद्यापीठातून त्यांनी केलेले. १९७९ पासून विदर्भ व मराठवाड्यात अनुक्रमे पैठण ,दाभापहूर, बाळापूर, पारस आणि कन्नड येथे, इंग्रजी या विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी एकूण ३४ वर्षे सेवा केली. नागपूर विद्यापीठातून १९८४ झाली बी. एड. झाले. भाषाशास्त्र या विषयात १९८९मध्ये पीएचडीची संधी त्यांना मिळाली. त्यांची अहिराणी बोलीचा समग्र अभ्यास असलेली तीन पुस्तके, १९९७ साली पुण्याच्या अक्षय प्रकाशना मार्फत त्यांनी प्रकाशित केली. यासाठी त्यांना त्या काळी खूप आर्थिक विवंचनेत जावे लागले. नोकरी अस्थायी असल्याने पगार अनियमीत. लेखनासाठी करावी लागणारी फिरस्ती, लेखन खर्च, प्रकाशनखर्च याची हातमिळवणी करतांना, पैश्यांची चणचण भासत होती. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. मीना सूर्यवंशी यांनी पुढे येत, आपली गळ्यातली मंगलपोत, सरांच्या हातात दिली. ती मोडून पैसा उभा केला गेला आणि आहिराणीचा हा अमुल्य ठेवा जगासमोर आला. घरातील लक्ष्मीने आपली गळ्यातली "पोत" दिली, म्हणून आहिराणी बोलीची "पत" समाजात वाढली, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. पुढे आदिवासी भिल्लांची बोली आणि आदिवासी ठाकरांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन लघु प्रकल्प, शासनाच्या आदिवासी विभागाला सादर करून डॉ. सुर्यवंशी यांनी स्वतःची आदिवासी ठाकर डॉट कॉम ही वेबसाईट २०१२ पासून सिद्ध केली. औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी ठाकरांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी १९८६ पासून सतत संघर्ष केला. हा लढा लढताना त्यांना, आपल्या संस्थाचालकांसह समाजातील धनदांडग्यांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचाही विरोध पत्करावा लागला. मात्र, प्रबोधन सेवा, अभयारण्य, पर्यावरण, पर्यटन, आदिवासी बोली व संस्कृती संशोधन हे त्यांचे आवडीचे विषय असल्याने, त्यांनी या विषयापासून स्वतःला दूर केले नाही. त्यांनी केलेल्या कामामुळे खान्देशातील, सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांवर मोलाचे संशोधन आणि लेखन झालेले आहे. यासाठी त्यांनी जे कठीण परीश्रम घेतले ते अतुलनीय असेच आहेत. शब्दकोश तयार करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या कार्डांनी दोन पोती भरली होती. त्या काळी तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हते. हस्तलिखितावरुन टंकलेखन करावं लागे. खेडोपाडी, गावोगावी, वाड्यावस्तींवर फिरुन, गोळाकेलेले हजारो शब्द, त्यांना वर्गीकरण, आकारविल्हे गुणविशेष, उत्पत्ती, व्याकरणात्मक नोंदींसह पुन्हापुन्हा लिहावे लागले. यासाठी त्यांना पत्नी सौ. मीनाताईंनी लेखनीक म्हणून मदत केली. त्यांनी सिध्द केलेल्या पुस्तकांच्या हस्तलिखितांनी एक गोदरेजचं कपाट भरलं आहे. ही आहिराणीची अमोल अशी संपत्ती आहे. तिचं जतन झालं पाहिजे. ती नव्या संशोधकांना कष्टाची, सातत्याची, चिकाटीची प्रेरणा आणि जिद्द देवू शकेल.

डाॅ. सुर्यवंशी यांचे अहिराणी भाषा-वैज्ञानिक अभ्यास, अहिराणी बोली म्हणी वाक्प्रचार, अहिराणी शब्द कोश ही पुस्तके १९९७ साली प्रकाशित झाली आहेत. प्रांजल ही मराठी कादंबरी १९९९ साली आली. खानदेशातील कृषक जीवन साचित्र कोष, हा खानदेशी जन जीवनावर आणि कृषक समाजाच्या जगण्यावर भाष्य करणारा सचित्र कोश २००२ साली प्रकाशित झाला. आप्पासाहेब नागरकर जीवन आणि कार्य हे व्यक्तिचित्र त्यांनी २००५ साली प्रकाशित केले. खानदेशातील विविध म्हणींचं वर्गीकरणात्मक संकलन २०१० रोजी आला. बोली आणि प्रमाणभाषा (खान्देशी), लोकसाहित्य आणि अभ्यास विषय (खान्देशी), आदिवासी ठाकर समाजशास्त्रीय अभ्यास, अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश, कन्नड तालुका दर्शन-गवताळा अभयारण्य, माणसं जगण्यासाठी- की वनखाते पोसण्यासाठी, भारत नी लाडकी लेक - परतिभाताई पाटील, अहिराणी बोली सुगम व्याकरण, आदिवासी ठाकर डॉट कॉम, अजिंठ्याचे डोंगर पर्यटन, अशी अनेक पुस्तके डॉक्टर सूर्यवंशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ठाकर समाजासाठी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये त्यांना स्वतःला जो शारीरिक मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला, त्या अनुभवांना शब्दबद्ध करून त्यांनी "शरणागत" अर्थात "प्रपत्ती" ही कादंबरी सिद्ध केली आहे. जी २०१८ मध्ये प्रकाशित झाली. त्यावर लवकरच एक चित्रपट येवू घातला आहे. एवढे विपुल साहित्य लेखन करूनही, डॉक्टर सूर्यवंशी यांच्या मनात अजूनही संशोधनाची ज्योत तेवत आहे. भविष्यामध्ये, आपण अजूनही काही संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

सर निवृत्त असूनही निवृत्त नाहीत. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःसाठी गौताळापरीसरात, हायवेला लागून, शेताचा एक छोटासा तुकडा घेतला आहे. तेथे त्यांनी एक टुमदार असं तुलशी फार्म हाऊस उभारलं आहे. त्यालाच जोडून तुलसी रिफ्रेशमेंट हे एक हाॅटेल बनवलं आहे. मागच्या बाजूला, सरांनी स्वतः राबून जैविक शेतीही फुलवली आहे. रासायनिक खतं, फवारे, औषधी टाळून, नैसर्गिक पध्दतीने ते शेती करतात. या छोट्या शेतात केळी, आंबा, पेरु, सिताफळ, शेवगा, निंबू, तुळस, आलं, कांदा, लसूण, कोथिंबीर, गहू, आणि अनेक प्रकारची फुलझाडांची शेती फुलवली आहे. यशस्वी करुन दाखवली आहे. शब्दांमध्ये लिलया रमणारा हा शब्दप्रभू, मायमातीशी नातं सांगत, मातीत राबणारा कर्मयोगी झाला आहे. आपल्या गरजा मर्यादीत ठेवून, आपली तुटपुंजी धनसंपत्ती आहिराणी, भिल्ल, ठाकर समाज बोलीची ग्रंथसंपदा निर्माण कार्यात आणि शेतीत लावून, ते तृप्तमनाने जीवन जगत आहेत. त्यांच्या दोघं मुली, साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. लहानी सौ. स्वप्नालीताई अमेरीकेत तर मोठी सौ. शितलताई मुंबईत, त्यांच्या क्षेत्रात उच्चपदावर यशस्वीपणे कार्य करीत आहेत. ज्या मुलीला आपण वेळप्रसंगी ३५ रुपयेसुध्दा देवू शकत नव्हतो, त्या मुलीने, शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभं रहात, नुकतीच ३५ लाखाची गाडी घेतली, हे सांगता एका बापाच्या चेहऱ्यावरील समाधान, कश्यातही मोजता येणार नाही, इतके अमुल्य असल्याचे मला वाटले.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नये असं अनंत फंदी म्हणतात. मात्र, डॉ. सूर्यवंशी यांनी धोपट मार्गा सोडून, बिकट मार्ग निवडला. त्यावर निष्ठेने चालले. आणि यशस्वी होवून दाखविले. असं त्यांच्याशी बोलतांना जाणवले. अनंत फंदींनी सांगितलेले इतर सर्व गुणांचा समुच्चय मात्र, त्यांच्यात आहे. म्हणून, ते मला इतरांपेक्षा वेगळे वाटतात. स्वकष्टाने समाज हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी जो झटतो, त्याला समाज वेड्यात काढतो. मात्र, अशी वेडी माणसंच इतिहास घडवत असतात. खान्देशातील बोली आणि संस्कृतीचं वेड लागलेला, हा भला माणूस, माझा मित्र असल्याचा मला, सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या सोबतीचा हा दरवळ, मलाही संशोधनात्मक कार्याची प्रेरणा, बळ देत राहिल. ती प्रेरणा घेवून आम्ही, भारावून त्यांचा निरोप घेतला.

♦️ धन्यवाद : संपादक डॉ. प्रभू आणि टिम आधुनिक केसरी♦️

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)



By.Dr. shivaji Huse ,Head of Dept - Marathi Dept , Shivaji College , Kannad -9423723491


Dr.Yashvant Pawar ,Medical Practitioner, Jay Kali sanskritik Mandal , Kannad Mob - 9764045422 / 9326222122





By Arun Thorat - Kalanki , Tq. Kannad - 9373787370 / 9422814240



sirगुरुवर्य डॉ

सर हे प्रत्येकाच्या नशिबात नाही पंचवीस वर्षां पासून तुम्हाला पाहतोय तीच ऊर्जा तोच उत्साह वाडी वस्ती असो की शहरे आपण सर्व व्यापी आहात लाखो दिन दुबळ्या आदिवाशींचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी पुढचा जन्मच काय सात जन्माचे पुण्य तुम्ही याच जन्मात कमविलेय तुमचे साहित्य लेखन म्हणजे खान्देश ची मायाळू माती आणि मराठवाड्याचा कणखर बाणा कन्नड तालुक्या वरती सर्वाधिक लेखण फक्त आपण केले याचा आम्हा भुमीपुत्रांना अभिमान आहे आपले बहुतांशी साहित्य पुस्तके लेख मी वाचलेय आपली प्रांजल ही कादंबरी एक सत्य जिवनपट आहे तालुक्यातील ईतिहास भुगोल वरिल पुस्तके आमच्या साठी मार्गदर्शकाचेकाम करतायेत कित्येकदा आपल्या घरी आलोय प्रत्येक वेळी आमचे झालेले आदरातिथ्य आम्हाला लाजवीत राहिलय आमच्या मावशींचा स्वभाव खुप प्रेमळ मायाळू आहे जणु काही शेतीमाती तील माऊलीच असा भास झाल्या शिवाय राहत नाही खरे तर आपण ईंग्रजी विषयाचे प्राध्यापक होता पण जिवनातील समाजकारणातीलसमाजशास्री म्हणूनच आपण वावरलात वास्तविक चांगली नोकरी घर गाडी सुखासीन जिवन असतांना ही आपण ऊन पावसात डोंगरदर्यात फिरलात कोर्ट कचेरी च्या फेऱ्यात अडकुन ही सत्या च्या भट्टीत सोन्या सारखे तापून सलाखुन निघालात हीच तुमच्या आयुष्याची खरी परिक्षा आणि ती ही शंभर पैकी शंभर गुणांनी उत्तीर्ण झालात सर तुम्ही जग जिंकलात आदिवासी ठाकरांचे खरे तारणहार आपण आहात आपल्या कर्तुत्वा मुळे हा समाज एका उंची वरती पोहचलाय तुमचे आयुष्य म्हणजे एक चित्रपट आहे खरे तर आपण आमच्या साठी खरे आदर्श आहात तुम्ही इतके पुण्य कमविलेय की शंभर वर्षां हून अधिक आयुष्य तुम्हाला लाभणार आहे कारण तुमच्या तील ऊर्जाच तुमचे भविष्य सांगतेय मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या कर्मयोग्यां पैकी तुम्ही प्रथम आणि शेवटचे योगी आहात मी तुमची स्तुती करत नाही तर माझा अनुभव सांगतोय ईश्वर आपली ही ऊर्जा अशीच तेवत ठेवो आणि आपणास दिर्घायु देवो आता आपला हाच आपला पुढील वारसा गुरुवर्य

सर चालवीत आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोतच

- अरुण थोरात कळंकीकर

सचिव- भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद कन्नड






Ramesh Borse ( Appa Borse ) Dhulia - Retired Teacher Mob - 8169723868


खानदेस रतन

डॉ. रमेश सूर्यवंशी

आहिरानी हायी नुसती भास्यानही तं संस्कृती से. आहिरानी भास्या आनि खानदेसनी संस्कृती जतनकरानं, वाढावानं कामआपुनले समधास्ले करानंसे. कोकणी मालवणीभास्याज सारखाज आपली मायबोली आहिरानीना इकासव्हवो, परचार परसारव्हवो यासाठे ज्याबोटवर मोजाइतका मानसेस्नी तयमयखाल बेंबीना देठपासीन झोकीसनकाम कय त्याम्हानं मोलनंनावं म्हंजे डॉ. रमेश सूर्यवंशी. प्रा.डॉ. दा.गो. बोरसे सारखाज आहिरानी भास्यासाठे कामनाडोंगर उभा कयाह्या मानुसनी ! त्यास्ना कामनंमोजमाप करता येवावंनही. आहिरानीना इतिहासलिखताना रमेश सूर्यवंशी यास्नानावना उल्लेख करासिवाय तोपूरा व्हवाव नही.

प्रा.डॉ. रमेशसूर्यवंशी यास्नी नी मन्हीभेट २५ मार्च२००० ले चायीसगावंना आ.भा. आहिरानी साहित्य संमेलनम्हा व्हयनी. पह्यलीज भेटम्हा त्यास्न मायबोलीवरल पिरेम त्यास्ना सबदसबदम्हा दिखी -हायंत. " लहान मूर्तीपन थोर किर्ती "आसा ह्या सातपुडाना सपुतनीवयख आज आपुनलेकरी ल्हेवानी से. डॉ. सूर्यवंशी ह्यामुयना सिंदाड ता.पाचोरा, जि जयगावंह्या धाकुलसा खेडाम्हाना. गरीबमराठा शेतकरी कुटुमम्हा त्यास्न बालपनंगय. त्यास्न सिक्सनभी खानदेसम्हाज व्हयन. मायबोली आहिरानीन बायकडू त्या तठेजपिनात नी त्यास्ले आहिरानी बोलानीगोडी लागनी. गोडमधाय आहिरानी त्याबोलतस. सर मराठीमाध्यमनी सायम्हाज सिकनात मातर इंग्रजी इसयल्हीसन त्या पदवीधरझायात. एम.ए.बीएड., पी.एच.डी. इतल सिकसनत्यासन व्हयेल से. उच्च माध्यमिक इद्दालयम्हा इंग्रजीना सिकसकम्हनिसन त्यास्नी सेवाकयी. मुयनी संसोधकव्रुत्ती आसामुये नागपूर इद्दापिठना भास्यासास्र इभागम्हाईन डॉ. सु. बा. कुलकर्णी यास्नामार्गदर्सनखालत्यास्नी पीएच डी. पदवीमियाडी. त्यासाठे त्यास्नी हाऊप्रबंध सादर कयथा, " खान्देशातील क्रुषकजीवन विषयक शब्दावलीचे भाषावैज्ञानिक अध्यनखंड १ व२ "

हाऊ मानुस धडपड्या सेआभ्यासू से, संसोधनम्हा तोसोताले गाडी ल्हेस. पीएच डी. व्हवावर भीतो भाऊ उगामुगा बसनानही. महाराष्ट्र सरकारना आदिवासी आनिप्रसिक्सन संस्था पुनाना मारफतदोनदाव संसोधन छात्रव्रुत्ती ल्हीसनदोन संसोधन प्रकल्प त्यास्नी पूराकयात... १) अजिंठाडोंगर परिसरातील भिल्लांची बोलीभाषा वैज्ञानिक अध्ययन२) अजिंठा डोंगरपरिसरातील ठाकरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनएक अभ्यास. खानदेस, आहिरानी भास्या, शेतकरी आनिआदिवासी जीवन यावरज रातदिनत्यास्न काम चालस. खानदेसना आनीमायबोलीना त्यास्ले भारी आभिमान से. मायबोली आहिरानी भास्या यकसंघ राहो, जात प्रदेसना नाववरंतीन्हा तुकडा पडोनैतं यासाठे त्याधडपडत राहतस. मध्यवर्ती, बागलानी, भिलाऊ, तडवी, गुजरी, लेवापाटीदारी ह्या समध्या आहिरानीन्याज बोलीसेत हायी त्याकयकयखाल सांगतस. तसा भेदकरनारेस्ले त्या रोखतस. २५/३० वरिस पासीनत्या आहिरानी भास्याना संसोधनम्हा गर्कसेत. त्यास्नी लिखेलपुस्तकेजवर यक नजर टाकीतं त्यास्न डोंगरयवढ काम आपुनलेआंचबाम्हा टाकस. त्यास्नी आवलोंग२१/२२ पुस्तके लिखेलसेत.त्या आसा१) अहिराणी भाषावैज्ञानिक अभ्यास २) अहिराणी शब्दकोश ३) अहिराणी म्हणी आणि वाकप्रचार ४) प्रांजल (कादंबरी) ५) खान्देशातील क्रुषकजीवन सचित्र कोश६) खान्देशातील म्हणी (वर्गीकरनात्मक) ७) बोली आणिप्रमाणभाषा खान्देशी ८) आदिवासी ठाकरसमाज शा.अभ्यास९) अप्पासाहेब नागदकरजीवन आणि कार्य ( संपादित ) १०) कन्नड तालुकादर्शन (संपादित) ११) गौताळा अभयारण्य मानसेजगवण्यासाठी की वनखाते पोसण्यासाठी? १२) भारतनी लाडकी लेकप्रतिभाताई पाटील (अनुवादित) १३) अहिराणी बोली पहिला शब्दकोश १४) अहिराणी बोली सुलभ व्याकरण १५) आदिवासी ठाकर डॉट काँम१६) शरणागत ( मराठीकादंबरी) १७) अजिंठ्याचे डोंगरपर्यटण, किल्ले अंतूर१८) अजिंठ्याचे डोंगरपर्यटन गौताळा आट्रमघाट वन्यजीव अभयारण्य ( रंगीतसचित्र ) १९) अहिराणी बोलीव मेळघाटातील गवळीबोली ( संशोधन लेखप्रकाशित ) क्रिटिकल इन्व्कायरी व्हाँल्यूम ६ अंक.

त्यास्नी हायी समधी साहित्यसंपदा दखताआपले कयस की, त्यास्नी संसोधनपर लिखान करेल से. आहिरानी आनि आदिवासी ह्याबोलीस्ना अभ्यास करी संसोधनपर लिखानकरेल से. आहिरानी तसजमराठी ह्या दोन्हीभास्याजम्हा लिखानं करेल से. " उचलीजीभ नी लायीटायुले " आसं काहीभी ठोकमठाक लिखेलनै. त्यासाठे त्याखेडापाडाजम्हाफिरनात, आदिवासीजम्हा राह्यनात फिरनातआनि पुरावा गोयाकरी मांडेल सेत. धाकला मोठा समधालेखकेस्ना पुस्तके वाची मधमासीना मायकसबद सबद गोयाकरी आहिरानी सब्दकोस तयारकरेल से. मायभूमिना गतजकर्मभूमी कन्नडनाभी त्यास्ले आभिमान से. त्यामुये कन्नडनभी त्यास्नी सब्दचितर रंगाडेल से. डोंगर, द-या, किल्ला, जंगल हायीसमध दखत फिरानंत्यास्ले येड से. तठेत्या जे जेदखतस ते तेयेचिसन त्या हिरीदम्हा टिपीठेवतस मंग सब्दरुपम्हा पुस्तकम्हा मांडतस. त्या कायमन्यारा न्यारा पेपरेजम्हा न्यारान्यारा इसयेजवर लिखानंकरत राहतस. त्यास्नी १) बापूराव देसाई २) रमेशबोरसे ३) डॉ. सुभाष चौधरी ४) डॉ. म.सु.पगारे ५) सौ.लतिका चौधरी ६) डॉ. वाल्मिक अहिरे७) डॉ. रजनीलुंगसे यास्ना पुस्तकेस्ले सबदसबद् वाचिसन प्रस्तावना देयेलसेत. सूर्यवंशी सरम्हंजे यक बहुआयामी यक्तिमत्व से.

आभाय यवढ कामराहीसनभी ह्या मानुसना पायजमिनवर सेत. त्यास्ना सभावम्हा खानदेसनी पुरनपोयीना गोडवासे. " मी म्हंजे कोन्हीमोठी आसामी से " आसीघमेंड त्या बायगतसनैत. आहिरानी मायबोलीना कामसाठे कोठेभीकव्हयभी बलावा त्या हाजरजराहतस. नही तंयकदोन पुस्तके लिखीसोताले गाढा पंडितसमजनारा काही मानसे मायबोलीना कार्यक्रमले येवानंभी मानधननं पाकिटमांगतस. म्हंजे जीमायना जीववर नावंव्हयनं मोठा व्हयनात तीलेजआंगठा दावतस.

डॉ. रमेश सूर्यवंशी यास्नासाहित्यिक आनि संसोधनना कामनंमोल चायीसगावंना तिसरासाहित्य संमेलनना आयोजक स्वागताध्यक्ष कै. अनिलदादा देशमुख, पद्माकर दादापाटील यास्नी कय. अनिल दादा देशमुखरत्नपारखी मानुस. त्यास्नी संमेलनना आध्यक्स म्हनिसन डॉ. रमेश सूर्यवंशी यास्नीनिवड कयी नीआध्यक्सपदले न्याव दिधा. समधाआहिरानी लेखक कवीस्नी हायीनिवडले यकमतखाल मान्यता दिधी. सरेस्ले आनखी बराज माननापदे भेटनात, सनमानव्हयनात. त्यास्नी नागपूर इद्दापिठना भास्यासास्र इभागनाआभ्यास मंडयवर निवडझायी ( १९९०-९३ ) क्रुसी इद्दापिठ राहूरीले बोलीप्रकल्पम्हा निबंध वाचन (१९९९) क्रुसी आकादमी दिल्लीकडथाईन आहिरानी भास्यासन्मान पुरस्कार साठेनानिवड समितीवर नेमनूक ( नोव्हेंबर २००० ) मराठी भास्याविश्व साहित्य संमेलनं वाशीमुंबई पुरस्कार आनिमानपत्र. वाशीना कार्यक्रमले मीसोता हाजर व्हतू. यादी तसी भलीमोठी से, मीमोजकज सांगी राह्यनू. तसजत्या पानि प्रस्न,पर्यावरन, आदिवासी जनजागृती, साहित्यिक उपक्रम आस्या कार्यसायास्ले मार्गदर्सन करतस. त्यास्ले सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक कामनी गोडी से. म्हनिसन त्या " शिवार सांस्कृतिक मंच " आनि " अखिलभारतीय खान्देश अकादमी " ह्यादोन रजिस्टर्ड संस्थास्ना संस्थापक आध्यक्स म्हनिनकाम करी राह्यनात. नोकरीम्हाईन रिटायर व्हवावर त्याकन्नडलेज स्थायिक व्हयेल सेत. मुयना सेतकरी कुटुमम्हाना आसामुये तठेसेती ल्ही सोताराबी सेती फुलाडीराह्यनात पिकाडी राह्यनात. त्यास्न्या दोन्हीआंडरी आनि जवाईसाफ्टवेअर इंजिनिअर म्हनिन आमेरिकाम्हा नवकरीकरी राह्यनात. पोरीस्लेज पोरगानागत लिखाडीसिकाडी वाढे लाये. पोरगा व्हवानी वाटदखत बसना नैत. हाऊभी यक त्यास्ना आदर्सल्हेवासारखा से.

डॉ. रमेश सूर्यवंशी सोतालेखक संसोधक सेतसजतसज त्या नवालिखनारेस्ले बय देतस, सल्लादेतस, मदतले उभाराहतस. मी मन्हीजगोट सांगस, चायीसगावंना संमेलनम्हा त्यास्नी मालेइचार, आप्पा तुमीगावकरी पेपरम्हा " आप्पान्या गप्पा " हायीसदर लिखतस. त्यालेखेस्ना संग्रोह करेल से का ? संग्रोह आसी तं मन्हाकडे द्दा, मी त्या लेखवाचस मंग त्यास्न कायकरानं ते सांगस. त्यास्ना सांगा परमाने मीते बाढ दिध. त्यास्नी ते बाढ वाचिसनकाही लेख निवाडीटाईप कयात आनिधुयाले यी मालेभेटीसन सांग, " बोरसे आप्पा दोनपयसा खरचानी तुमनीतयारी आसी तंतुमना लेखेस्न आप्पान्या गप्पाहायी पुस्तक काढानीमन्ही इच्छा से. मायबोलीसाठे पलेना दोन पयसाखरचात तं तुमनाहातेघायी आहिरानीनी हायी मोठी सेवाघडी " मी थोडस कांकू कय, समधासोंगे आनता येतसपैसास्न सोंग आनता येतनै. आखेरले मीबायको पोरेस्ना इचारल्ही हा सांग. मी हा सांगताज सरेस्ले हुरूपउना त्या कामलेलागनात. डी.टी.पी. त्यास्नी सोताजकय. त्यास्नी औरंगाबाद पुनेमंबई फिरी प्रकासकभी सोधीकाढात. आप्पान्या गप्पाभाग १ डोंबिवलीले आनिभाग २ औरंगाबादले छापात. प्रस्तावना भी त्यास्नीज लिखी. प्रस्तावनाम्हामन्हा ह्या लेखननंत्यास्नी तोंडभरी कवतुक करेल से. आसा परकारे ह्याभला मानुसनी खेडाम्हाना यकसाया मास्तरले आहिरानी साहित्यिक म्हनिनसन्मान मियाडी दिधा.

आज त्यास्नावर हाऊलेख लिखानी संधीमाले खानदेसनी वानगीमुये भेटनी. हायीगोटना माले भारीआनन झाया. मीत्यास्ले जोगेथाईन दखेल से आयकेलसे.मी त्यास्ना काहीपुस्तके भी वाचेल सेत. त्यामुये मी जे जेलिख ते तेआभ्यास करी मांडेलसे. प्रा.डॉ. रमेश सूर्यवंशी हायीबावनकसी सोनं से त्याखानदेसनी माटीना लाल सेतहिरा सेत. त्यास्ले खानदेसी साहित्यकेस कडथाईन मानना फेटा- मुजरा - सलाम.

रमेश आप्पा बोरसे

संपादक

" खानदेसनी वानगी "


Ramesh Suryawanshi सर आपला हा सर्व प्रवास खूप काही देऊ करणारा आहे अन् या बाबतीत बोरसे सरांनी जे काही सविस्तर रुपात या लेख माध्यमातून लिहण्याचे काम केले हे खूप ग्रेट आहे..!अहिराणी भाषेसाठी असो किंवा कन्नड चाळीसगाव जवळ असलेले पर्यटन क्षेत्र यांच्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन नेहमीच भेटत असते,या विषयी केलेलं अभ्यासपूर्ण लेखन नेहमीच वाचनात येत असते,खूप छान माहितीपूर्ण लेख..!1

Ashok Shinde चोवीस कॕरेटना खान्देस रतन शेतस डाॕ. रमेश सूर्यवंशी सर. अहिरानी साहित्यिकनी खरी ओळख रेमश आप्पा बोरसे सरस्नी या लेखमा करेल शे.सर्वास्नी मनपाईन वाचो असा लेख शे.दोन्ही रमेश साहित्यकस्नी गत आपुनभी अहिरानी भाषा सेवा करता वरत लिऊत नि माय अहिरानीना इकास नि परचार करूत.

डॉ रमेश दादा सूर्यवंशी एक समर्पित समाजसेवी साहित्यिक संशोधक


Jagatpuriya D.B. Poet, writer, Journalist and freelance writer from Dhulia , now Residing in Aurangabad




नमस्कार, पुस्तक परिचय या सत्रात मी आज अशा एका महान विभुतीचा परिचय करून देणार आहे कि मी यासाठी आठ दहा वर्षापासून मी स्वतः संपर्क करत होतो.खरं तर त्यांचे नाव आणि बोलीभाषा योगदान बऱ्याच दिवसांपासून फक्त ऐकून होतो.आजही भेट झाली नाही पण संपर्क मात्र झाला याचा मनस्वी आनंद होत आहे. खरं तर माझ्याकडे आलेले प्रत्येक पुस्तक वाचतोच आणि मग ते सप्रेम भेट प्रत असो की विकत घेतलेले असो त्या विषयी चार ओळी तरी पुस्तक आणि लेखक परिचय म्हणून लिहतोच. खरं तर पुस्तक परिचय आणि समीक्षा यात महत अंतर असते पण आपण जे ही काही वाचतो आवडले तर इतरांना सांगतो हाच माझा उद्देश्य आहे.म्हणून मी मुद्दाम पुस्तक परिचय हा शब्दप्रयोग करतो. डॉ. रमेश सुर्यवंशी यांचे 'अहिराणी बोलीभाषा शब्दकोश' हा अहिराणी भाषेतील पहिला शब्दकोश आज माझ्या हातात आहे. खरं तर तो फक्त एकदाच वाचून चालणार नाही. जेव्हा जेव्हा अहिराणी भाषेतील शब्द अडतील तेंव्हा तो खचितच मदतीस धावून येईल ही खात्री वाटते.खरं तर डॉ. रमेश सुर्यवंशी सरांना मी अनेक दिवसांपासून मँसेजरवर संपर्क करण्यासाठी प्रयत्नशील होतो पण काही कारणास्तव तो होवू शकला नाही. परंतु महिनाभरात मला त्यांचा संपर्क भ्रमणध्वनीमुळे झाला. माझे त्यांच्याशी बोलणे झाले. सरांना मी विनंती करून त्यांचे सर्व संदर्भ ग्रंथ आणि इतर साहित्य मिळावे यासाठी विनंती केली आणि क्षणाचाही विलंभ न लावता अगदी प्रिटींग खर्चात त्यांनी मला सदर ऐवज घरपोच पाठवला याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. चार आठ दिवसापासून मी त्यांचा' अहिराणी शब्दकोश अभ्यासत आहे.की जो बोलीभाषेतील पहिलाच शब्दकोश आहे. अनेक लुप्त होणारे शब्द आणि म्हणी,वाक्प्रचार अशा अनेक भांडारानी सम्रुध्द असा प्रकार वाचतांना आनंद होत आहे. खान्देशी नकाशापासून तर अगदी लयाला गेलेल्या बाबी यात नमूद आहे अर्थात यामागे सरांची प्रचंड मेहनत आणि बुद्धिमत्ता दिसुन येते.अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी बोलीभाषेसाठी महत्त्वाचे कार्य करून ठेवले आहे आणि ते नक्कीच आमच्यासाठी व नवीन पिढीला दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरेल ही मनोमनी खात्री वाटते. डॉ. रमेश सुर्यवंशी सर उच्च विद्याविभूषित आहे. भाषाशास्रात ते डाँक्टरेट (पि.एच.डी.) या पदवीने श्रीमंत आहेत.त्यांचे योगदान नक्कीच विसरता येणार नाही. सदर पुस्तकाची पाठराखण मोठमोठ्या साहित्यिकांनी केली आहे. त्यात डॉ. यु.म.पठाण, प्राचार्य रा.र.बोराडे,डॉ. रवींद्र ठाकूर,डॉ. मधुकर वाकोडे. यांनी त्यांच्या कार्याचा बहुमोल शब्दात गौरव केला आहे. बोलीभाषा आणि भाषाप्रेमी अभ्यासकांच्या ग्रंथालयात सदर पुस्तक असायला हवे.याचा नक्कीच फायदा होईल. जवळपास त्यांची अजून आठ दहा पुस्तके आहेत त्यात बोलीभाषा अहिराणी, अदिवासी संस्कृती आणि कांदबरी असे अने साहित्य गंगाजळी आहे. एक एक वाचून आस्वाद घेऊन मग त्याविषयी सविस्तर लिहेलच. डॉ. रमेश सुर्यवंशी सरांना मी पुनश्च एकवार धन्यवाद देतो.आपले कार्य असेच सदैव जोमाने चालू राहण्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुर्तास थांबतो. प्रवीण देवरे मुंबई २५-०९-२०२२







43 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


bottom of page