top of page

मेळघाटातील गवळी आणि खानदेशातील अहिर

Writer's picture: Dr.Ramesh SuryawanshiDr.Ramesh Suryawanshi

मेळघाटातील गवळी आणि खानदेशातील अहिर

डॉ. रमेश सूर्यवंशी,

अभ्यासिका,

वाणी मंगल कार्यालया समोर ,

कन्नड जि औरांगाबद

महाराष्ट्र पिन ४३११०३

संपर्क ८४४६४३२२१८

मला फेसबुक अन व्हाटस् ॲप वर बरेच मित्र आहेत मी एकदा अहिराणीतून एक पोस्ट टाकली. अमरावतीच्या व्यायमशाळेतील एका चतूर्थश्रेणीच्या कर्मचारी गजानन चव्हाण यांनी तीला लाईक करुन मला फोन करुन माझी जात व भाषा विचारली, अन 'आमची भाषा तुम्हाला कशी येते; याची चौकशी केली मी त्याला वेळोवळी फोन करुन मेळघाट, गवळी, गवळ्यांची बोली, गवळ्यांची इतर गांवे अन इतर गवळ्यांचे मोबाईल क्रमांक विचारलेत सततचा संपर्क ठेवला

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून शिवाजी महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून मे २०१४ ला निवृत्त झालो पूर्वी यवतमाळ जिल्हातील दाभापहूर व अकोला जिल्हातील बाळापूर व पारस येथेही नोकरी केलेली असल्याने त्या नोकरीचा फायदा हवा असेल तर तेथले शिक्षणाधिका-यांची प्रतिस्वाक्षरी हवी होती माझे प्रतिस्वाक्षरीचे काम केवळ पाच मिनिटात झाले पुढे काय ! मी फोन डायरी उघडली त्यात कोरकू बोलीवर काम करणारे परतवाड्याचे डॉ. ब-हाटे यांचा फोन मिळाला ते त्यांचे पिएच. डी. चे काम करीत असतांना त्यांचा परिचय झालेलाच होता त्यांना फोन करताच त्यांनी रात्री जेवायला अन मुक्कामालाच या असा आग्रहच केला. आता परतवाडा मुक्कामी मला या गवळीवर चर्चा करायला अन त्या गावांना भेट द्यायला ही चांगली संधी जुळून आलेली होती

सकाळी चहा घेवून त्यांच्या गाडीने आम्ही सारे गवळी असलेल्या देवगांव या गावी गेलोत गवळ्यांची वस्ती असलेला हा गाव सतत आदर्श गांव म्हणून पुरस्कार पटकावित आलेला सरपंच गजाभाउकडे गेलोत तेही अचानक अवेळी आलेले पाहूणे म्हणून दुधातील भजे असा काही नवीनच पण चवदार छान पदार्थ नास्त्याला होता गावातील आठदहा बुजूर्ग माणसं बैठकीत मी जमलेल्यांशी मुद्दाम अहिराणीतून बोलायला सुरवात केली. आपलाच माणूस, आपल्याच जातीचा माणूस भेटला अशा आनंदात सा-यागप्पा-टप्पांना उत आला काय काय बोलावं अन काय काय विचारावं असं झालं. खानदेशपासून खूप दूरवर या मेळघाटातील दुर्गम परिसरात आपली अहिराणी बोली अन संस्कृती एका समाजाने जपून ठेवलेली आहे हे प्रथमच कळाले होते यावर या पूर्वी ना ग्रिअरसनने भाष्य केलेले होते ना डॉ. गणेश देवींनी. एक नवा अभ्यास विषय मला प्रथमच हाताळायला मिळत होता याचा आनंद हा वेगळाच होता .

संपूर्ण गाव फिरलोत गाव खरोखरच आदर्श आहेच. मी सहज लहानमुलांच्या विटीदांडूच्या खेळाविषयी आणि त्या खेळात वापरल्या जाणा-या शब्दावली विषयी विचारले काही म्हाता-यांनी टोलवलेली विटी पासूनचे अंतर मोजण्यासाठीची शब्दावली व त्या नुसारचे खेळीचे प्रकार सांगितले किंचिंत थेाड्या फार फरकाने या खेळात व शब्दावलीत कमालीचे साम्य आढळले. मी सारं काही अहिराणी बोलीतून म्हणजे त्यांच्या बोलीतून चर्चा करीत असल्याने डॉ. ब-हाटेंना या सा-या साम्य असणा-या बाबीचे मोठे कौतूक वाटले.

तसेच ग्रांमपंचायत कार्यालयात गेलोत. तेथे गजा भाउंनी काही महिला मुली , पुरुष यांना बोलावले. त्यांच्या पारंपारिक सण, उत्सव, गाणी, संकेत, विविध विधी यावर गप्पा रंगल्या काही व्हिडीओज घेतलेत गप्पा रेकॉड केल्या. हे ऐक नव क्षेत्र होतं याला कुंणीही स्पर्श केलेला नव्हताच

खानदेशातील अहिराणी बोली अन अहिर आणि मेळघाटातील गवळी अन गवळी बोली हे भिन्न नसून एकच आहेत ही बाब डाॅ रमेश वरखेडे आणि डॉ. गणेश देवी यांच्या कानीही घातली एक संशोधन निंबंध डॉ. रमेश वरखेडे यांच्या क्रिटिकल इन्कॉयरीला प्रकाशितही केला. पुढे यावर काम व्हावे हा आग्रह अनेक मित्रांनाही केला. योगायोगाने मेळघाटातील श्री.संजय ईश्वरदास गायन सारखे दोन तीन विद्यार्थी वेळोवळी परतवाङयाचे डॉ. ब-हाटे सरांचा सल्ला घेवून मेळघाटातील नंदगवळी समाजाची लोकसंस्कृती ,बोली वा समाज यावरील संशोधनाच्या कामालाही लागलेत. परिसरातबरीच विविध विधींची लोकगिते आहेत. केवळ लोकगिताचें संकलनच हेच काम नाही तर लोकसंस्कृतीचाही अभ्यास करता येणारा आहे. यूदवंशीची वंशावळ, एकूण भारतातील आणि विदर्भातील गवळीसमाज , संस्कृती आणि इतिहास पाहता येईल. महिलांचा पोषाख आणि आभूषणे , महिलांची बारस्याची गाणी, जात्यावरची गाणी , लग्नातली विधी व गाणी, महिलांचे विविध खेळ व गाणी, पुरुषाची हेळा, धुवाळा, जिकळी भजने, बावा, सैनाजी हे विविध लोकगितांचे प्रकार या परिसरात प्र्चलीत आहेत. त्यांचे संकलन होणार आहे. या परिसरातील लाकगितांचे प्रकार मराठीच्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांना अद्यापही माहितच नाहीत. लोकसाहित्याचे एक नवे दालन खुले होईल. या मेळघाटातील गवळी समाजाच रुढी पंरपरा, विधी, गाणी अन बोली ही खानदेशच्या अहिरांच्या रुढी पंरपरा, विधी, गाणी अन बोली यांचेशी कमालीचे साम्य राखते. हे आद्यापही खानदेशातील किंवा विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अभ्यासकांना, संशोधकांना माहित नाही.

खानदेश आणि मेळघाट खूप मोठे भौगोलिक अंतर असून देखील खानदेशातील अहिरांची अहिराणी बोली आणि मेळघाटातील गवळ्याचीं गवळी बोली ही एक आहे उलट गवळ्यांनी अहिरांनी बोली आणि संस्कृती ही मूळ स्वरुपात टिकवून ठेवलेली दिसते. या उलट खानदेशातील दळणवळणाची साधने, शिक्षण, नोकरी, आधूनिक तंत्रज्ञान व प्रचार, प्रसार माध्यमांमूळे बोली आणि विविध प्रकारचे विधीं यात बदल घडून आलेला आहे. समाज, संस्कृती आणि बोलीचा अभ्यास करावा लागेल. दुग्ध व्यवसायाशी संबंघित हेळा आणि धंडोई हे गीत प्रकार आणि वल्दा ही पंरपरा खानदेशात हद्दपार झालेली दिसते. ती मेळघाटात टिकून आहे. स्त्रियांच्या दागिन्यातील पाटल्या, मुंदी, गरसोयी, डोरल्या, सरी, करमफूल, नत, साकई, ही शब्दावली खानदेशातील अहिराणी बोलीत टिकून आहे. मेळघाटातील जिकळी आणि धुवाळा हा प्रकार नसला तरी सैनाजी हा गाण्याचा प्रकार खानदेशात आणि मेळघाटात दोनही ठिकाणी आढळतो. मेळघाटातील पुरुषांची बाराकशी ही खानदेशात बारबंदी झाली आहे. विवाहातील पाट लावनं, आटसाटं, लाडा, लांडगा ही शब्दावली व रिती मेळघाटाप्रमाणे खानदेशातही रुढ आहे. लग्नातील खणखण कुदई मन मन माटी हे लोकगित मेळघाटाप्रमाणे खानदेशातही सर्वत्र गायीले जाते. विवाहप्रसंगी मृत पूर्वजांच्या आत्म्यांना निवतं देण्याची पद्धती मेळघाटातील सातभैारी प्रमाणे खानदेशातही वडले वरनन या विधीत सामावलेली आहे. मेळघाटातील वधावना पद्धतीप्रमाणे खानदेशातील बहिण नवरदेवाला गृहप्रवेशाचेवळी मुसळ आडवे लावते व होणारी पहिली मुलगी सून म्हणून मांझ्या मुलाला देण्याची मागणी करते, तर मेळघाटातील बहिण ही दुग्धव्यवसायाशी पोषक असं गोधन मागते. वरवधू यांना काकन हे दोनही भूभागत बांधतांना आढळतात व ते सोडवतांना गाणीही म्हणतात गाण्यातील गंमती जमती, चेष्टा, शिव्या या दोनही प्रदेशात आढळतात. खानदेशात असलेले आहेना किंवा अह्यना हे कूटप्रश्न मेळघाटात जितानी कहाणी किंवा आळावना किंवा आडगा पाडगा या नावाने प्रचलित आहेत. खानदेशातही मेळघाटा प्रमाणे आपल्या बैलानां आणि म्हशीना विषेश नामांनी पुकारतात. मात्रं विदर्भातील इतर भागात म्हशीना शींग अशी हाळी देवून बोलवतात.

खानदेशातील अहिर आणि त्यांची अहिराणी ही मेळघाटातील गवळी व गवळी बोलीशी साम्य राखतात असं म्हणण्या ऐवजी हे दोनही एकच आहेत. मात्र दोघांची परस्परांना अद्याप ओळख नव्हती आणि भैागोलिग अंतरामुळे आणि जवळ असलेल्या बोली व जनजाती यांच्या संपर्कामुळे परस्परात थोडा बहूत वेगळेपणा आला आहे. खानदेशच्या बोलीचे आणि संस्कृतीचे अभ्यासक आणि मेळघातील समाज, बोली व संस्कृती यांचे अभ्यासक यांचेसाठी अभ्यासाचे हे एक नवे दालन आहे.

जरी जगाच्या लोकसंख्येत गवळ्यांचा वाटा हा तीन टक्के तर भारताच्या लोकसंख्येत हाच वाटा विस टक्के असला तरी आजवर महाराष्ट्रातील गवळी समाजावर म्हणावे तेवढे लिखाण झालेले नाही. कोकणातील गवळी समाजावर मानगावच्या कृष्णाजी विठ्ठल खेडेकरांनी लिहिले होते. अहिरांवर बरीच लेखण झालेले आहे. मात्र मेळघाटातील गवळी समाजाच्या संस्कृतीवर , लोकगितांवर संकलन वा लेखन अपवादानेच आढळते. जगभर पसरलेल्य या गवळी समाजाला अहिर, यादव, गवळी, धनगर, हटकर ही विविध नावे आहेत. केरळात ते मनियार,, तामीळनाडू मध्ये कोनर या नावानेही ओळखले जातात. हे सारेच स्वतःला यदूवंशातील मानतात, सा-यांचाच परंपरागत व्यवसाय हा गुरे राखणे, दुग्ध पालन हाच होता. आणि सारे कृष्णाला भजतात, हा गवळी कुठेही असला तरी या तीन बाबी बाबतीत त्यांच्या साम्य दिसते. प्रदेश् निहाय, रुढी , परंपरा, त्यांचेशी संबंधित शब्दावली ही बदलली असेल, बोली ही बदलत गेली असेल मात्र त्यांच्यातील हा भेद अणि एकरुपता यांचा अभ्यासा साठी समस्त अभ्यासकांना मेळघाट खुणवतो आहे हे निश्चित.

-----०००----














18 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


  • Facebook
  • LinkedIn
  • Blogger
  • YouTube

+918446432218 +919421432218

+912435299218

Abhyasika,1,Sidhartha Colony, Kannad,

Dist.Chatrapati Sambhaji Nagar 

( Maharashtra) India pin 431103

©2022 by rameshsuryawanshi.com Created by Samadhan Sonwane

bottom of page