top of page

दिपावली - मेळघाटातील

दिपावली - मेळघाटातील


खानदेशात अहिर लोक राहतात , त्यांची बोली ही अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते मात्र आजवर अहिराणी बोलीच्या अभ्यासकांना आपली अहिराणी बोली आणि अहिर संस्कृती इतरत्रही जपली जाते हे ज्ञात नव्हते. ऐवढेच नाही तर भारतातील सर्वच बोलीचे सर्वेक्ष्‍ण करणारा इंग्रज अधिकारी ग्रिअरसन किंवा भारतीय बोलीच्या सर्वेक्ष्‍णाती बोलींचे नमुने संकलन करणारे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या नजरेतून हा मुद्दा सुटलेला आहे. या इंटरनेट मुळे सारं जग जवळ आलं असं म्हटलं जात. अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेचा एक कर्मचारी गजानन चव्हाण हा माझा फेसबुक फ्रेण्ड होता. तो मेळघाटातील गवळी जमातीचा होता. इंटरनेटवर बोली व संस्कृती यांच्या माहितीची देवाण घेवाण करतांना मला बोली आणि रुढीपंरंपरा यात साम्य आढळले आणि मी मेळघाटातील गवळ्यांच्या गावांना भेटी दिल्या.

मेळघाटातील गवळी जातीचे लोक गोंड, कोरकू, कोलाम या आदिवासी जातींसोबत राहतात. प्रत्येक जातीची बोली आणि संस्कृती ही वेगवेगळी आहेच. काही गावे ही पूर्णतः गवळी लोकांची आहेत. या सर्व गवळ्यांची बोली ही गवळी बोली आहे आणि ही गवळी बोली खानदेशातील अहिरांची अहिराणी बोलीच आहे. मला ही बाब आढळून आल्या नंतर मी मेळघाटातील गवळ्यांच्या गावांना सण वार वा लग्नसोहळा पाहून भेटीही दिल्यात मला या अहिर आणि गवळी यांच्या बोली आणि रुढीपंरपरा यातील साम्य त्यांच्या विषयीच्या सखोल अभ्यासासाठी प्रवृत्त करुन गेले. मेळघाटातील गवळी अन खानदेशातील अहिर अन भारतभर पसरलेले गवळी वा यादव हे सारे एकच आहेत. परिसरातील संस्कृती वा बोलीचा प्रभाव त्या त्या भागात झालेला असावा. मात्र या अहिर, गवळी व यादव यांच्यात तीन बाबीचे साम्य आढळते. हे सारेच स्वतःला यदू चे वंशज मानतात, श्रीकृष्णाला आपला पूर्वज मानतात अन सारेच गोधन अन दुग्धपालनात व्यस्त असतात, तोच त्यांचा पारंपारिक व्यवसाय मानतात. गुजरात मध्ये यांना अहिर किंवा गौला तर केरळ मध्ये यांना मनियार म्हणून ओळखतात. तर तामीळनाडूत हे कोनर या नावाने ओळखले जातात. गोप, गोपाल, गौला, अहिर , अभिर, अनियार, नायर , किंवा यादव अशा विविध नांवांनी ओळखले जाणारे अहिर हे मंळघाटात गवळी म्हणून ओळखले जातात. आदिवासी भाग असल्याने डोगराळ मेळघाटातील दळणवळण नावालाच आहे . त्यामुळे या गवळी लोकांनी जपलेली बोली आणि संस्कृती ही काहीशा मूळ स्वरुपातील, इतरांचा प्रभाव न पडलेल्या स्वरुपात आहे. हल्ली खानदेशाची बोली अणि रुढीपरंपरा या विपूल दळणवळण आणि शिक्षण यामुळे खूप बदलले आहे. मात्र या खानदेशातील अहिराणीला या मेळघाटातील गवळ्यांनी आजही जपून ठवेलेले आहे. एवढेच नाही तर सण ,वार, रुढी, परंपराही त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. अहिरांच्या बोलीचा विचार करता मेळघाटातील गवळी बोली ही गवळी बोली म्हणून तर खानदेशातील अहिरांची बोली ही अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते. काठेवाड कच्छ परिसरातील गवळ यांची बोली ही गुजरातीशी साम्य राखते. चंबा आणि कांगरा टेकड्यावरिल गवळी यांची बोली ही गड्डी किंवा गठरी बोली म्हणून ओळखली जाते. हरियानातील गवळ्यांची बोली ही राजस्थानीशी साम्य राखते नेपाळी बोली ही गुजराती आणि अहिराणीशी साम्य राखते.

तामिळ वाङ्मयात अय्यर हा शब्द अभिरांसाठी वापरला आहे. तामिळ बोलीत अइर म्हणजे गाय. किलापट्टीकरम मध्ये अईरपट्टी हा शब्द खानदेशातील अहिरानपट्टी म्हणजे अहिरांचे वस्तीस्थान या अर्थाने वापरला जातो अईर म्हणजे गाय अन अईरपट्टी म्हणजे गोपालकांचे वसती स्थान. इतर खेालात जावून मांडणी करण्याची ही जागा नाही. दिपावली अंकानिमित्ताने आणि जागेचा विचार करता लेखाचा विस्तार हा केवळ मेळघाटातील गवळ्यांची दिवाळी विषयावर केंद्रीत करु या ।

मेळघाटावर गवळी राज्याने राज्य केले व तेथे असलेले गाविलगड व नरनाळा हे किल्ले गवळी राज्यांचे. मेळघाटातील गवळी लोकांचे आज वास्तव्य चिखलदरा, अचलपूर, धारणी, चांदूर बाजार, अन मध्यप्रदेशाच्या लागून असलेल्या बैतूल या परिसरात आढळते. या गवळ्यांचा मुख्य पारंपारिक व्यवसाय हा गोपलान. पशूधनाला ते पुजतात. दिपावली , बारस हा पशूधनाची पूजा करण्याचा सण. खानदेशातील अहिरांकडे हल्ली ताक सुद्धा विकले जाते मात्र मेळघाटात आजही आपल्या कुलनामानुसार आठवड्यातील ठरलेला दिवस सारे दूध पैसे न घेता वाटण्याचा दिवस असतो. दूध, रबडी, बासूंदी करुन ती गावात आलेल्या गेलेल्यांना वाटली जाते. वाटून हे दूध संपत नसेल त त्याचे दही व लोणी करुन जवळ असलेल्या बै-हम या देवाला चिटकवून येतात व तूप हे दिवाबत्तीसाठी देवाला देतात. या दूध वा तूप देवाला अर्पण करण्याच्या वा गावभर वाटण्याच्या पद्धतीला ' वल्दा ' असे म्हणतात वल्दा म्हणजे देवाच्या नावाने काढलेले दूध किंवा तूप. सा-या गायी म्हशी या कृष्णाच्या, मग त्यांची काळजीही तशीच घ्यावी ही भावना. विशेष म्हणजे सारा गावं, अंगण, घर, पाय---या, भिंती या दररोज शेणामातीने सारवलेल्या दिसतात. दरवेळी गोमूत्र शिंपडून सारं सारं स्वच्छ ठेवलं जात. गो म्हणजे गाय गोपाल काला , जन्माष्टमी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

सारी घरे ही मातीची काही सिमेन्टची ही असतात. सारी घरे दिवाळी पूर्वी पंधरा विस दिवस आधिच शेणामातीने सारवली जातात. अंगणाचा काणा कोपरा सुद्धा पावसाळ्यात वाहून गेलेली माती भर टाकून पुन्हा सारवली जाते वरच्या वाजूला चुण्याचा पांढरा पट्टाही मारलेला असतो. घराच्या व जिण्याच्या पाय-या सुद्धा सारवलेल्या दिसतात. हा स्वच्छतेचा व शेणामातीने सारं सारं सारवण्याचा कार्यक्रम केवळ दिवाळी पुरता नसतो तर वर्षभर दररोज आढळतो . अंगण , तुळशी वृंदावन, ओसरी, पाय-या सांर सार सारवलं जात. गुरे चारायला नेणारा व काळजी घेणारा गुराखी हा 'मस्क्या ' म्हणून ओळखला जातो. त्याला म्हस्क्या म्हूणनच ओळखतात. हा म्हस्क्या माळी पौर्णिमे पासून ' हेळा ' गुणगुणायला लागतो ' हेळा ' ही गाणी असतात, त्यातून गोधनाची,कृष्णाची , देवाचीं प्रशंसा केलेली असते. हेळा म्हणण्या अगोदर “धंडोई’’ हा प्रकार गायीला जातो. म्हस्क्या हा गायी राखणारा पुरुष सुती कापडाचा काकडा घेवून या गायी म्हशीच्या पाठीवरुन प्रेमाने फिरवितो, ओवाळतो त्या वेळी ‘हेळा’ गायीला जातो. सामोरा समोर असलेल्या या गायीच्या गोठ्यातील म्हस्के ताला सुरात हेळा गातात. काही म्हस्के सुरात सूर मिसळून स्पर्धात्मक पद्धतीने हेळा गातात. म्हस्क्या माळी पौर्णिमेपासून गेाठ्यात हेळा गुणगुणतो. दिवाळीचे पाच दिवस अगोदर पासून गायीच अंगावर दही शिंपडून अंगावरुन पेटवलेला काकडा उतरवतात. त्यावेळी आठ दहा वेळा हेळा म्हटल्या जातो. हेळा मध्ये देवदेवतांची स्तूती, गोधनाची स्तूती गायीलेली असते. गायी म्हशी हा हेळा स्तब्ध होवून एकतात. गोधनावर जीवापड प्रेम करणा-या या गवळंयासाठी हा आनंदाचा क्षण असतो. लक्ष्मीपूजनाचे दिवशी म्हस्क्या गायी म्हशी चारुन नदीवर आणतो. तेथे त्यांची ओवाळून पूजाही केली जाते. त्यांना धूप देवून नदीत आंघोळ घातली जाते. घरामध्ये गोडधेाड पदार्थ बनविले जातात. काही महिला घरात लक्ष्मीपुजनाची , घटस्थापनेची तयारी करतात, अंगणात चौफेर सडासारवन करुन सायंकाळी दिवे लावतात. तुळशीवृंदावन, गोठा , उकीरडा, घराचे छत, अंगण, मंदिरे, घरातील जाते, उखळ, रवी इ ठिकाणी सर्वत्र दिवे लावतात. घटस्थापना करुन चौरंगाच्या बाजूला ठेवलेल्या ‘औरंगाची” पूजा दिवे लावून करतात. गायी म्हशींच्या गळ्यातील साज असलेल्या घंटा, घोगर, घुंगरु कसाट, टापर,चाय साकय, शेब्या, मोरपिस इ यांना “औरंग” असे म्हणतात. तेथे म्हस्क्या ज्या वस्तू वापरतो त्या सुद्धा ठेवल्या जातात. त्यात प्रामुख्याने खा-या, पई, लठ, घेांगडा, खादी यांचा समावेश असतो.”लठ” हा म्हस्क्याचा गुरे राखण्यासाठीचा लाकडी सोटा असतो. त्याची जाडी , उंची ही ठरलेली असते. तेथे महिलांचे दागदागिनेही ठेवली जातात. सा-यांची पूजा केली जाते. पुजा झाल्यावर सारे परस्परांना नमस्कार करतात, पाया पडतात. त्या नंतर गोठ्यातील गायी म्हशीची पूजा केली जाते म्हस्क्या पुन्हा काकडा ओवाळून हेळा गातो .

म्हस्क्या आपल्या गळ्यात अडकवलेल खा-याने म्हशींच्या शिंग व कान या मधील मळ काढतो. खा-या ही पर्स सारखी लाकडापासून बनविलेली पिशवीवजा कुपी असते. त्यात म्हस्क्या खोब-याचा तुकडा ठेवतो. म्हशीला ये, ये म्हणून बोलावतो. म्हैस्क्या बसलेला असतो, बाजूला गळयातील खा-या व खेाबरे म्हशीला दिसते. म्हैस ते खातेः हा म्हस्क्या तीच्या शिंग व कान या मधील मळ म्हसफणीच्या साह्याने काढतो. त्या खा-याला कवड्, घुगरू व रंगीत दोरी गळ्यात अडकविण्यासाठी असते. खा-या हा फणी, घुगरु,यांनी विणलेला असतो. खा-या गाई म्हशींना मिठ चारण्यासाठी असायचा. या खा-यात ‘ म्हैस फणी ‘ असते. ती चाकू सारखी असते ती सांबराच्या शिंगापासून कोरिव नक्षीकाम केलेली असते.

गोवर्धन किंवा गाय गोधन पुजा साठी महिला सकाळी लवकर उठून सडासारवण करुन अंगणातही दिवे लावतात. सारे सदस्य उटणे लावून अंघेाळी करतात. मुले व पुरुष छातीवर कर्दोळाचा चौघडा घालतात, ( करगोटा किंवा करधेाडा, जो लाल रंगाचा असतो तो जानव्या सारखा गळ्यात घालून एका हाताच्या बाजूला कमरेकडे परिधान केलेल्या नव्या कपड्यांच वरुन घालतात ) नवीन कपडे परिधान करतात. व गाय गेांधनाच्या पूजेला सुरवात करतात. म्हस्क्या गोठ्यातील गायी म्हशीची अंघोळ करतो, रंगरंगोटी करतो पूजन करतो, गाई म्हशीच्या अंगावरुन गेरु व दही शिंपडतो गेरुचे लाल पंजे उमटवतो. मग गायी म्हशींना औरंग ( सारा साज ) घातली जाते. शिंगांना मोरपंखांची शेबी लावली जाते. फुलांचा हारही घातला जातो. सारा साज झाल्यावर म्हस्क्या गायी म्हशी घरासमोर पूजेसाठी आरती साठी उभे करतो. महिला शेणाने गोवर्धन तयार करतात. त्यावेळी गाय वासरु, चूल, माठावर माठ, रवी, म्हस्क्या, गवळण, गोपाल कृष्ण्‍ अशा प्रतीकृती केल्या जातात. दही गेरु शिंपडले जाते. गोठयामध्ये गव्हाचा पिठाचा चौघडा काढला जातो. गाणी म्हटली जातात. म्हस्क्या आपल्या गळ्यात खा-या अडकवून हाता लठ घेवून गायी म्हशी घरी आरती साठी आणतो. सर्व सदस्य गोधनाचीपूजा करतात. गायी म्हशीना व म्हस्क्याला ओवाळले जाते. म्हस्क्याची दृष्ट काढली जाते. हा म्हस्क्या या गवळीसाठी महत्वाचा असतो व आजचा दिवस हा म्हस्क्याच्या मानाचा असतो. त्याचेवरच या गवळ्यांचे व गोधनाचे सर्वस्व अवलंबून असते. म्हस्क्याच्या कष्टातून ऋणातून उतराई होण्याचा हा दिवस असतो. मालक म्हस्क्याची गळाभेट घेतात. म्हस्क्या गोधनावरुन काकडा ओवाळून ‘धंडोयी’ गातो व ‘हेळा’ म्हणायला सुरवात करतो. हे सारे झाल्यावर म्हस्क्या गायी म्हशींना पळवितो सारे हर्षेाल्हादाने आनंद लूटतात.

दुपारी हे सारे आटोपून सारे गवळी मंदिरात किंवा मोकळ्या जागी जमा होतात. परस्परांची गळाभेट घेतात. दिवाळीच्या फराळाचा सारे आनंद लूटतात- गप्पा गोष्टी करतात. अशाच प्रकारे स्त्रीयांचाही भेटीचा कार्यक्रम पार पडतो.

जरी पंधरा दिवसांपासून दिपावलीची तयारी सुरु असते तरी दिपावलीचे तीन दिवस म्हस्क्या, गायी म्हशी आणि या गवळी अबालवृद्धांसाठी मोठ्या आनंदाचे असतात.

डॉ. रमेश सूर्यवंशी

अभ्यासिका,

वाणी मंगल कार्यालया समोर

कन्नड जिल्हा- छ संभाजीनगर - औरंगाबाद -

संपर्क ८४४६४३२२१८

Mail rss221718@gmail com

गवळयाचे सारवलेले घर


गवळी पारंपारीक

खा-या

पारंपारिक

गवळयाची हट्‌टी

गवळयाचे सारवलेले घर

20 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


bottom of page