top of page

आहिराणी बोलीचा शब्दकोष ज्यांनी संशोधनातून सिध्द केला त्यांनीच माझा खान्देश भूषणने गौरव केला




आहिराणी बोलीचा शब्दकोष,

ज्यांनी संशोधनातून सिध्द केला,

त्याच डॉ. रमेश सुर्यवंशींनी,

माझा "खान्देश भूषण"ने गौरव केला.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

अत्तर क्षणांचा सुगंध / १५ /

प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३.

समाजामध्ये काही माणसं फक्त स्वतःसाठी जगतात. काही माणसं ही आपल्या कुटुंबापुरती जगतात. काही माणसं ही घरदार सोडून विरक्त होवून, संन्यासी होतात तर काही माणसं ही समाजाची होवून समाजासाठी जगतात. स्वतःसाठी, कुटुंबासाठी किडे, मुंगेही जगतात. विरक्त होवून अनेक साधू पुरुष वणवण जगभर फिरतात. यासाठी फार काही करावं लागत नाही. मात्र, घर उत्तम पध्दतीने सांभाळून समाजासाठी जगायला खूप काही करावं लागतं. इमानदारी, सचोटी, काटकसर, त्याग, कष्ट, सातत्य आणि समर्पण यांचा सुयोग्य मेळ जमतो, तेव्हा एखाद्याच्या हातून समाजोध्दाराचं कार्य घडून येतं. खान्देशातील सुपूत्र आणि मराठवाड्यातील कर्मयोगी डॉ. रमेश सूर्यवंशी हे असेच एक समाजसेवक आहेत. त्यांनी आपल्या मातृभूमीचं, मायबोलीचं ऋण फेडण्यासाठी आहिराणी बोलीतून संशोधन करुन, अत्यंत महत्वाची अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांचे आहिराणी शब्दकोश, आहिराणी म्हणी आणि वाक्प्रचार तसेच खान्देशातील सचित्र कृषक जनजीवन हे ग्रंथ म्हणजे खान्देशचा सांस्कृतिक ठेवा आहे. जोडुनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी. असं संत तुकाराम महाराज म्हणतात. सन्मार्गाने धन जुळवून, त्याचा उत्तम व्यवहारासाठी उपयोग करावा. विचारांमध्ये परिपक्वता आणून, जीवन व्यतीत करावं. या उक्तीवर डॉ. सूर्यवंशी यांचं जगणं बेतलेलं आहे. असा हा समाजप्रबोधक माझ्या लोकसंख्या विस्फोट व्यंगचित्रात्मक प्रदर्शनाच्या रुपाने माझ्याशी जुळला. माझा शब्दमित्र झाला. त्यांच्या साधना, संशोधनाने ते कधी माझा गुरु झाले, ते मलाही कळलं नाही. नुकताच त्यांच्याच हस्ते मला वापी (गुजरात) येथे आहिराणी भाषेतील माझ्या योगदानाबद्दल "खान्देश भूषण" पुरस्कार बहाल करण्यात आला. तो माझ्या जीवनातला एक अत्तर क्षण बनून गेला. आपलं अवघं आयुष्य ज्या माणसाने आहिराणी बोली संशोधनात घालवलं, त्यांच्याच हस्ते आपला गौरव होणं, याहून मोठा आनंद नाही. हा आनंद ज्यांनी मला दिला त्या सौ. सुनिताताई पाटील (नाशिक) आणि संग्रामसिंह राणा (वापी) यांचा मी ऋणाईत झालो आहे. वापीतला हा अत्तर क्षण, माझं उर्वरीत आयुष्य सुगंधी करुन टाकायला पुरेसा आहे. या क्षणाने डॉ. सूर्यवंशी आणि माझ्यातील नात्याला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे.



९० च्या दशकात, मी स्वतःला लोकसंख्या शिक्षणणाच्या कार्याला वाहून घेतलं होतं. माझ्या या व्यंगचित्र प्रदर्शनाची माहिती, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सूर्यवंशी यांना कळाली. त्यांनी त्यांच्या कन्नडच्या महाविद्यालयात प्रदर्शनासाठी मला आमंत्रित केले. मी आनंदाने त्यांचं निमंत्रण स्विकारलं. प्रदर्शन भरवलं. विद्यार्थ्यी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रदर्शन कमालीचं यशस्वी झालं. सरांनी एक कार्यक्रम घेवून माझा उचित सत्कार केला. घरी आग्रहाने पाहुणचार केला. ओळख ना पाळख, तरी आम्ही आमच्या सामाजिक कार्यामुळे एकत्र आलो. जुळले गेलो. मित्र झालो. आपलं काम करत असतांना, समाजाचं आपण देणं लागतो. समाजासाठीही काही केलं पाहिजे. हा विचार आमच्यातला बंध झाला. तो पुढे दृढ होत गेला.

सूर्यवंशी सरांनी आपल्या स्वभावानुसार पुढे स्वतःला, खान्देशी संस्कृती आणि बोली भाषा यात गुंतवून घेतले. एकदा मी आखाजी निमित्ताने आमच्या घरी झालेल्या पूजेचे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध केले. ते सरांना मोलाचे वाटले. त्यांनी त्यांच्या संशोधनात्मक लेखात, ते चित्र लोकप्रभाला प्रसिद्ध केले. मला लेखही पाठविला. ही त्यांची गुणग्राहकता. ते कुठेही गेले, म्हणजे सोबत एक वही ठेवतात. तिवर ते त्या भागतील बोलीचे संवाद, शब्द, म्हणी, वाक्प्रचार, चालीरीती, अवजार, भांडी यांच्या नोंदी टिपून घेतात. घरीगेल्यावर त्याचे वर्गीकरण करुन, आपला संग्रह वाढवतात. यातून त्याचं संशोधन पूर्ण झालं आहे. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला शासकीय, विद्यापीठीय आणि संशोधनात्मक दृष्ट्या मान्यताप्राप्त झाली आहे. त्यांच्या संशोधनामुळे खान्देशातील ठाकर समाजातील लोकांना जात प्रमाणपत्रे मिळाली. त्यांना हक्क, शिक्षण, नोकऱ्या, अनुदान मिळाले. यासाठी त्यांना लढावे लागले. संघर्ष करावा लागला. हा संघर्ष त्यांच्या जीवावर उठला होता. संसार उध्वस्त होवू शकला असता. त्यांना चूकीच्या पध्दतीने अटक झाली. अनेक कलमं लावली गेली. मात्र, ते डगमगले नाही. भिडले, लढले आणि विजयी झाले. याच काळात त्यांनी शासनाला दाखल केलेले संशोधनात्मक काम डॉ. गोविंद गारे या एका आयएएस अधिकाऱ्याने हडपले. त्यावर त्याने परस्पर, स्वतः पुस्तक छापून घेतले. ते डाॅ. सूर्यवंशी याना कळले. तेव्हा त्यांनी काॅपी राईट ॲक्टची केस टाकून, त्या अधिकाऱ्याला उघडे पाडले. माफीनामा लिहून घेतला. तेथेही ते विजयी झाले.

वापीच्या आहिराणी साहित्य संमेलननाच्या निमित्ताने, नात्याच्या बंधावर बसलेली धूळ झटकली गेली. आहिराणी लोकसाहित्यावर यापूर्वी डॉ. दा. गो. बोरसे, यांनीही मौलिक संशोधन प्रसिद्ध केले आहे. ते मला मिळेल कां म्हणून मी सरांना फोन केला. त्यांनी तात्काळ होकार भरला. मात्र, त्यासाठी घरी भेट देण्याची अट त्यांनी घातली. मीही सत्वर तयार झालो. त्यासाठी, मित्र रमेश धनगर, एकनाथ गोफणे व समाधान सोनवणे आम्ही एकत्र कन्नड गेलो. एका कर्मयोग्याला, त्याच्याच कर्मभूमीत भेटलो. संवाद साधला. मनसोक्त चर्चा केली. सौ. मीनाताईंनी खापरावरची पुरणपोळी आणि आमरसाचा आग्रहपूर्वक पाहूणचार केला. मनाची आणि पोटाची तृप्तता झाली. एक वेगळंच समाधान या स्नेहभेटीत प्राप्त झालं.

डाॅ. रमेश सुर्यवंशी यांचा जन्म १ जून १९५६ रोजी शिंदाड ता. पाचोरा जि. जळगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. बालपण व प्राथमिक शिक्षण खान्देश व मराठवाड्यात तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा व नागपूर विद्यापीठातून त्यांनी केलेले. १९७९ पासून विदर्भ व मराठवाड्यात अनुक्रमे पैठण ,दाभापहूर, बाळापूर, पारस आणि कन्नड येथे, इंग्रजी या विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी एकूण ३४ वर्षे सेवा केली. नागपूर विद्यापीठातून १९८४ झाली बी. एड. झाले. भाषाशास्त्र या विषयात १९८९मध्ये पीएचडीची संधी त्यांना मिळाली. त्यांची अहिराणी बोलीचा समग्र अभ्यास असलेली तीन पुस्तके, १९९७ साली पुण्याच्या अक्षय प्रकाशना मार्फत त्यांनी प्रकाशित केली. यासाठी त्यांना त्या काळी खूप आर्थिक विवंचनेत जावे लागले. नोकरी अस्थायी असल्याने पगार अनियमीत. लेखनासाठी करावी लागणारी फिरस्ती, लेखन खर्च, प्रकाशनखर्च याची हातमिळवणी करतांना, पैश्यांची चणचण भासत होती. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. मीना सूर्यवंशी यांनी पुढे येत, आपली गळ्यातली मंगलपोत, सरांच्या हातात दिली. ती मोडून पैसा उभा केला गेला आणि आहिराणीचा हा अमुल्य ठेवा जगासमोर आला. घरातील लक्ष्मीने आपली गळ्यातली "पोत" दिली, म्हणून आहिराणी बोलीची "पत" समाजात वाढली, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. पुढे आदिवासी भिल्लांची बोली आणि आदिवासी ठाकरांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन लघु प्रकल्प, शासनाच्या आदिवासी विभागाला सादर करून डॉ. सुर्यवंशी यांनी स्वतःची आदिवासी ठाकर डॉट कॉम ही वेबसाईट २०१२ पासून सिद्ध केली. औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी ठाकरांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी १९८६ पासून सतत संघर्ष केला. हा लढा लढताना त्यांना, आपल्या संस्थाचालकांसह समाजातील धनदांडग्यांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचाही विरोध पत्करावा लागला. मात्र, प्रबोधन सेवा, अभयारण्य, पर्यावरण, पर्यटन, आदिवासी बोली व संस्कृती संशोधन हे त्यांचे आवडीचे विषय असल्याने, त्यांनी या विषयापासून स्वतःला दूर केले नाही. त्यांनी केलेल्या कामामुळे खान्देशातील, सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांवर मोलाचे संशोधन आणि लेखन झालेले आहे. यासाठी त्यांनी जे कठीण परीश्रम घेतले ते अतुलनीय असेच आहेत. शब्दकोश तयार करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या कार्डांनी दोन पोती भरली होती. त्या काळी तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हते. हस्तलिखितावरुन टंकलेखन करावं लागे. खेडोपाडी, गावोगावी, वाड्यावस्तींवर फिरुन, गोळाकेलेले हजारो शब्द, त्यांना वर्गीकरण, आकारविल्हे गुणविशेष, उत्पत्ती, व्याकरणात्मक नोंदींसह पुन्हापुन्हा लिहावे लागले. यासाठी त्यांना पत्नी सौ. मीनाताईंनी लेखनीक म्हणून मदत केली. त्यांनी सिध्द केलेल्या पुस्तकांच्या हस्तलिखितांनी एक गोदरेजचं कपाट भरलं आहे. ही आहिराणीची अमोल अशी संपत्ती आहे. तिचं जतन झालं पाहिजे. ती नव्या संशोधकांना कष्टाची, सातत्याची, चिकाटीची प्रेरणा आणि जिद्द देवू शकेल.



डाॅ. सुर्यवंशी यांचे अहिराणी भाषा-वैज्ञानिक अभ्यास, अहिराणी बोली म्हणी वाक्प्रचार, अहिराणी शब्द कोश ही पुस्तके १९९७ साली प्रकाशित झाली आहेत. प्रांजल ही मराठी कादंबरी १९९९ साली आली. खानदेशातील कृषक जीवन साचित्र कोष, हा खानदेशी जन जीवनावर आणि कृषक समाजाच्या जगण्यावर भाष्य करणारा सचित्र कोश २००२ साली प्रकाशित झाला. आप्पासाहेब नागरकर जीवन आणि कार्य हे व्यक्तिचित्र त्यांनी २००५ साली प्रकाशित केले. खानदेशातील विविध म्हणींचं वर्गीकरणात्मक संकलन २०१० रोजी आला. बोली आणि प्रमाणभाषा (खान्देशी), लोकसाहित्य आणि अभ्यास विषय (खान्देशी), आदिवासी ठाकर समाजशास्त्रीय अभ्यास, अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश, कन्नड तालुका दर्शन-गवताळा अभयारण्य, माणसं जगण्यासाठी- की वनखाते पोसण्यासाठी, भारत नी लाडकी लेक - परतिभाताई पाटील, अहिराणी बोली सुगम व्याकरण, आदिवासी ठाकर डॉट कॉम, अजिंठ्याचे डोंगर पर्यटन, अशी अनेक पुस्तके डॉक्टर सूर्यवंशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ठाकर समाजासाठी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये त्यांना स्वतःला जो शारीरिक मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला, त्या अनुभवांना शब्दबद्ध करून त्यांनी "शरणागत" अर्थात "प्रपत्ती" ही कादंबरी सिद्ध केली आहे. जी २०१८ मध्ये प्रकाशित झाली. त्यावर लवकरच एक चित्रपट येवू घातला आहे. एवढे विपुल साहित्य लेखन करूनही, डॉक्टर सूर्यवंशी यांच्या मनात अजूनही संशोधनाची ज्योत तेवत आहे. भविष्यामध्ये, आपण अजूनही काही संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

सर निवृत्त असूनही निवृत्त नाहीत. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःसाठी गौताळापरीसरात, हायवेला लागून, शेताचा एक छोटासा तुकडा घेतला आहे. तेथे त्यांनी एक टुमदार असं तुलशी फार्म हाऊस उभारलं आहे. त्यालाच जोडून तुलसी रिफ्रेशमेंट हे एक हाॅटेल बनवलं आहे. मागच्या बाजूला, सरांनी स्वतः राबून जैविक शेतीही फुलवली आहे. रासायनिक खतं, फवारे, औषधी टाळून, नैसर्गिक पध्दतीने ते शेती करतात. या छोट्या शेतात केळी, आंबा, पेरु, सिताफळ, शेवगा, निंबू, तुळस, आलं, कांदा, लसूण, कोथिंबीर, गहू, आणि अनेक प्रकारची फुलझाडांची शेती फुलवली आहे. यशस्वी करुन दाखवली आहे. शब्दांमध्ये लिलया रमणारा हा शब्दप्रभू, मायमातीशी नातं सांगत, मातीत राबणारा कर्मयोगी झाला आहे. आपल्या गरजा मर्यादीत ठेवून, आपली तुटपुंजी धनसंपत्ती आहिराणी, भिल्ल, ठाकर समाज बोलीची ग्रंथसंपदा निर्माण कार्यात आणि शेतीत लावून, ते तृप्तमनाने जीवन जगत आहेत. त्यांच्या दोघं मुली, साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. लहानी सौ. स्वप्नालीताई अमेरीकेत तर मोठी सौ. शितलताई मुंबईत, त्यांच्या क्षेत्रात उच्चपदावर यशस्वीपणे कार्य करीत आहेत. ज्या मुलीला आपण वेळप्रसंगी ३५ रुपयेसुध्दा देवू शकत नव्हतो, त्या मुलीने, शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभं रहात, नुकतीच ३५ लाखाची गाडी घेतली, हे सांगता एका बापाच्या चेहऱ्यावरील समाधान, कश्यातही मोजता येणार नाही, इतके अमुल्य असल्याचे मला वाटले.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नये असं अनंत फंदी म्हणतात. मात्र, डॉ. सूर्यवंशी यांनी धोपट मार्गा सोडून, बिकट मार्ग निवडला. त्यावर निष्ठेने चालले. आणि यशस्वी होवून दाखविले. असं त्यांच्याशी बोलतांना जाणवले. अनंत फंदींनी सांगितलेले इतर सर्व गुणांचा समुच्चय मात्र, त्यांच्यात आहे. म्हणून, ते मला इतरांपेक्षा वेगळे वाटतात. स्वकष्टाने समाज हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी जो झटतो, त्याला समाज वेड्यात काढतो. मात्र, अशी वेडी माणसंच इतिहास घडवत असतात. खान्देशातील बोली आणि संस्कृतीचं वेड लागलेला, हा भला माणूस, माझा मित्र असल्याचा मला, सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या सोबतीचा हा दरवळ, मलाही संशोधनात्मक कार्याची प्रेरणा, बळ देत राहिल. ती प्रेरणा घेवून आम्ही, भारावून त्यांचा निरोप घेतला.

♦️ धन्यवाद : संपादक डॉ. प्रभू आणि टिम आधुनिक केसरी♦️

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

62 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


bottom of page