लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने असऺ किंवा नोकरी असताना मग डाळ घेऊन जा. ज्वारी घेऊन जा. गहू घेऊन जा…असं किरकोळ किरकोळ काहीतरी घेऊन जा असं म्हणत असे. असं वाटायचं आपल्याला माये पोटी विनाकारण आई त्रास घेते, थकते. स्वतःसाठी न ठेवता आपल्यासाठी बांधून देते. म्हणून मी दरवेळेस म्हणत होतो , नको - नको , एवढं ओझं !! तिकडे नेण्यापेक्षा तिथे विकत घेतलेला परवडते. हमाली द्या, ओझे न्या, गाड्यांना गर्दी असते, चढता येत नाही, उतरता येत नाही, हात दुखतो असं काहीतरी सांगून न्यायचं टाळत असे. तिच्या मनात अशी भावना असे की आपण प्रेमाने दिलेलं याने न्यावं……पण हे त्यावेळेस कळत नव्हतं आपल्याला असं वाटायचं की हिला विनाकारणच त्रास कशासाठी द्यावा? आपल्यासाठी ती काटकसर करतेय, पोटाला चिमटा देते आणि स्वतः न उपभोगता आपल्याला बांधून देते. हे काय योग्य नाही ! म्हणून मी सुद्धा प्रेमापोटी, माये पोटी ते न्यायचं टाळत असे.
आज मुली
लग्न होऊन सासरी गेल्यात. नोकरीमध्ये व्यस्त आहेत. मोठा पगार कमावतात.मोठ्या फ्लॅटमध्ये राहतात.नातवाला भेटायला जायचं. मुलीला भेटायला जायचं. आता गाडी आहे.मग आपल्या गाडीमध्ये डाळ घेऊन जाऊ, आपल्या शेतातली लसण घेऊन जाऊ , आपल्या शेतातला पपया,केळी घेऊन जाऊ असं वाटतंय.आणि गाडीत टाकून आपण नेतोही. मात्र ते पाहून मुलगी रागावते, कशासाठी आणता तुम्ही? आम्ही ताज्या, ताज्या घेतोय. इथे थोडं थोडं घेतो. आमच्या वातावरणात मुंबईसारख्या ठिकाणी ते टिकत नाही. खराब होतं.कामांमध्ये आम्ही व्यस्त असतो.ऊन दाखवता येत नाही. तुम्ही आणत जाऊ नकाज्ञ!! अर्थात तिचं हे सुद्धा आपल्याला जसं पूर्वी वाटायचं आपल्या आई विषयी तसं तिला सुद्धा वाटत असतं पप्पा मम्मींनी ते स्वतःच वापराव… आपण पगार कमवतो, आपण विकत घेऊ शकतो, त्यांनी का म्हणून त्याग करावा आणि आपल्याला मायापोटी जे हाती लागेल ते दरवेळेला घेऊन यावं? अर्थात यात तिचं सुद्धा तसंच प्रेम असतं जे आपलं आपल्या आई विषयी, आई देत असलेल्या वस्तू नाकारताना होतं तसंच ….मात्र आता लक्षात येतं आपण प्रेमाने मायाने तिला देतो ती ते नाकारते ते सुद्धा त्याच प्रेमाने आणि मायेमुळे. पण हे आपल्याला कळत नाही! ते प्रेमापोटी नाकारते आणि तिलाही कळत नाही हे पप्पा जे आणतात ते आपल्या प्रेमापोटी आणतात आपण ते स्वीकारायला हवं!!
यासाठी जरी आणलेल्या वस्तूंची अडगळ वाटली, नकोशी वाटली तरीसुद्धा ती न नाकारता केवळ प्रेमापोटी ती वस्तू आणलेली आहे म्हणून स्वीकारून घ्यावी आणि त्यांच्या प्रेमळ मन सांभाळून घ्यावं बस इतकच!! मग ती वस्तू वापरणे असो की नसो मात्र कालांतराने त्या आणलेल्या वस्तूची स्तुती करावी मन सांभाळले जातात आणि त्यांनाही आनंद वाटतो बस इतकच
Comments