top of page

Dr.Ramesh Suryawanshi -Life 

माहिती व संक्षिप्त परिचय (Bio-Data)

माझ्या जीवनाविषयी

                  बालपण आणि शिक्षण :- राहणार खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यातील शिंदाड या गावचा. मुळगाव शिंदाड . मामांचे गाव सोयगाव तालुक्यातील वडगाव तिगजी. बनोटी आणि नागद या मोठ्या गावापासून जवळ. त्याला शिंदोळ वडगाव असेही म्हणतात. जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मोडणाऱ्या वडगाव या गावात झाला. बालपणाची एक दोन वर्ष मूळ गावात गेली असावीत. बालपणीच वडील वारल्याने शिक्षण मामांकडेच झाले. मला तीन मामा एक शेती करायचे दुसऱे बँकेत होते आणि तिसरे शिक्षक होते. पहिली दुसरी वडगाव झालं तिसरी चौथी शिंदाड तर पाचवी ते आठवी कन्नड तालुक्यातील विटा औराळा या गावी बँकेत असलेल्या मामांकडे झाले. आठवी नववी दहावी अकरावी आणि पीयूसी हे शिक्षण कन्नड येथील शिक्षक असलेल्या कै. भीमराव पाटील या शिक्षक मामाकडे झाले. बालपणाचे सारे संस्कार अन शिक्षण गांधीवादी तत्त्वज्ञान बाळगणाऱ्या अशा शिक्षक मामाऺच्या शिस्तीत पार पडले. बीए द्वितीय आणि तृतीय वर्ष सोयगावच्या ज्ञानेश्वर विद्यालयात तर एम ए इंग्रजीसाठी मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झाले याच विद्यापीठातून डी टी इ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टीचिंग ऑफ इंग्लिश हा डिप्लोमाही केला. शिक्षण होतास 1979 यावर्षी शेती करणाऱ्या मामांची मुलगी मिनाबाई हिच्याशी विवाहबद्ध झालो.

   शिक्षकी पेशात प्रवेश :-   ऑगस्ट 1979 ला पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयाला इंग्रजीचा शिक्षक म्हणून नेमणुक मिळाली. येथे पगार न झाल्याने वृत्तपत्रात यवतमाळ जिल्ह्याची जाहिरात पाहून दाभा पहूर या गावातील एस. व्ही .एम .आणि पी.सी.एल विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून रुजू झालो. या गावात असताना विदर्भातील बोली मला कळेना अन त्यांना मराठवाड्याची बोली, खानदेशी बोली कळेना. अनेक शब्दांची गल्लत होई. पहिल्या दिवशी झोरा, बंडी, वाडी, सातीत, भेद्र हे शब्द कळाली तर नाहीतच. मी पहिलाच वर्षी विदर्भातले शब्दांचा संकलन सुरू केलं. त्यानंतर मला नागपूर विद्यापीठाची भाषाशास्त्र विभागाची जाहिरात वाचण्यात आली. मी पोस्ट कार्डवर भाषाशास्त्रातून एम फिल करण्याची इच्छा व्यक्त करून भाषाशास्त्र विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले. पत्राची दखल घेत , भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सु.बा. कुलकर्णी यांनी लांबलचक उत्तर दिले. नोकरी करून एम फिल करता येणं शक्य नाही, त्याऐवजी बहिस्थ राहून पीएचडी करता येईल असं त्यांनी सांगितलं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असं झालं. जाऊन भेटलो चार-सहा महिने माझी परीक्षा पाहून त्यांनी मला अहिराणी बोली शी संबंधित संशोधनासाठी परवानगी दिली. 1980 पासून अहिराणीशी संबंधित शब्दावली म्हणी वाक्प्रचार कृषी क्रिया, बलुतेदारांची अवजारे  या सर्वा संबंधीची शब्दावली, अहिराणी लोकगीत यांचं संकलन सुरू झालं. संशोधनाचा विषय होता खानदेशातील कृषक जीवन विषयक शब्दावलीचे भाषा वैज्ञानिक अध्ययन. यासाठी शब्दावलीचे  कागदाच्या चिटोर-यांचे पेटारे भरत गेले. दाभापहूर हे गाव बाबूळगाव ते नेर या रस्त्यावर. दाभा आणि पहुर हे दोन गावे. या दोन गावांच्या मध्ये रस्त्यावर शाळा. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आणि अकरावी बारावी विज्ञान शाखेला मंजुरी अशी ही शाळा. गांव खूप लहान खेड़ऺ होत. सुविधा एवढ्या उपलब्ध नव्हत्या. गावाच्या दोन्ही बाजूला नद्या त्यामुळे यवतमाळ जाणं किंवा नेर जाणू पावसाळ्यात अवघड होऊन बसले. नुकताच लग्न होऊन या गावात आलेलो. नेमकी पावसात पत्नीची प्रकृती बिघडली. गावात रेशन सोडायला आलेली ट्रक तिच्या सहाय्याने यवतमाळ दवाखान्यात पोहोचलो. आणि सासऱ्यांना केलेली तार सुद्धा आम्हाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना पोहोचली. सुखदुःखाच्या परिस्थितीत इतक्या लांब वर नको वाटायला लागलं म्हणून पुन्हा जाहिरात पाहिली आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरला धनाबाई विद्यालयात हजर झालो. तेथे मात्र प्राचार्य आणि माझं काही जमलं नाही दुसऱ्या वर्षी पारच्या सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव लांडे  सर बाळापुर ला येऊन मला पारस ला घेऊन गेलेत पारसला. पारस हे अकोल्यापासून जवळ होते अकोल्याला पोलीस स्टेशन समोर मशीदीच्या समोर मच्छी मार्केटमध्ये मोठे भंगार मार्केट असे. तेथील टेप रेकॉर्डर, रेडीओ वगैरे आणून रातनरात ते दुरुस्त करत बसू. एक छंद लागला होता.  त्याच्या  शिवाय पिएच.डी.च्या कामाला हात लावू वाटत नव्हता. महाराष्ट्रात असताना बाहेरून बीएड करण्याची सोय होती. चार सुट्या महाविद्यालयाला जावं लागे. दोन उन्हाळ्याच्या अन दोन दिवाळीच्या. मी आणि माझा मित्र अवि इंगळे जो पुलगावला लेबर कॅम्प कनिष्ठ महाविद्यालयाला होता, आम्ही दोघांनी स्वावलंबी महाविद्यालय वर्धा येथे प्रवेश घेतला. आणि दोन दिवाळीच्या सुट्ट्या आणि दोन उन्हाळ्याच्या सुट्ट्या पूर्ण करून बीएड केले. ते दोन वर्षे सुद्धा कादंबरी सारखेच गेलेत. तिसऱ्या वर्षी पारसला पुन्हा नोटीस पे देऊन राजीनामा देऊन कन्नडच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉक्टर भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून ऑगस्ट 85 पासून रुजू झालो. येथे ऑगस्ट 1985 ते 1990 अगेन्स बॅक लॉग म्हणून दरवर्षी टर्मिनेशन जाहिरात, अपॉइंटमेंट, अप्रोहल या चक्रातून जावं लागलं. या सर्व गाव बदलण्यामध्ये, सामानाच्या वाहतुकीत ते सामान कधी पावसात भिजले .कधी शब्दांचे खोके उलट पालट झालेत. पुन्हा सारे शब्द अकारबिल्याने लावायला चार चार महिने खर्च करावे लागलेत.  पारसला जरी तट्ट्याबोर्याची शाळा होती. शाळेला स्वतःची अशी भव्य अशी इमारत नव्हती. औष्णिक विद्युत केंद्र असल्यामुळे राज्यातील लोक नोकरीला होते आणि त्यामुळे त्या शाळेत इंग्लिश मीडियम च्या त्या काळात दोन दोन तीन तीन तुकड्या होत्या. त्यामुळे शिकवण्यातही एक मजा होती. मी राजीनामा देऊन कन्नडला जाण्यासाठी त्यावेळी प्राचार्य लांडेंनी बराच विरोध केला. पण याच कॉलेजचा विद्यार्थी बालपण कन्नडमध्ये गेलेलं आणि इकडे संस्थाचालकांचाही मोठा आग्रह यातून मी पारस सोडले आणि कन्नडला 1985 ल रूजू झालो. कन्नडला आल्यानंत सर्वसामान एका प्रशस्त रूममध्ये लावले. कन्नडचे कनिष्ठ महाविद्यालय हे वरिष्ठ महाविद्यालयात जोडून होतं. त्यामुळे येथे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जगताप प्राध्यापक गीतखाने हे मराठीचे प्राध्यापक असल्याने एक दोन पोते जमा झालेले आणि एकत्रित झालेले सर्व शब्दांचे कार्ड्स अकारविल्याने लावण्यासाठी रात्रंदिवस त्यांची मदत घेतली. दुर्दैवाने आज दोन्ही मित्र जग सोडून गेलेत. कन्नड ला येऊनही समाधान वाटेना. प्राचार्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक या मंडळींमध्ये थोडा सुपरॅरिटी कॉम्प्लेक्स होता. मी तर कनिष्ठ महाविद्यालयाला तेही इंग्रजीचा आणि अहिराणीत पीएचडी करतोय , आणि भाषाशास्त्र विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीज वरही आहे. ही बाब त्यांना माझ्याकडूनची लोन कढी थाप वाटे. एक तर मी बारा गाव फिरलेलो, त्यामुळे स्थानिक संस्था चालकांचा इतरांना जसा धाक वाटायचा तसा मला वाटेना. त्यामुळे माझ्या वर्तनात इतरांपेक्षा थोडा फरक होता. नोकर आणि मालक असे संबंध मी झुगारून देत होतो. बाकी सहकारी संस्थाचालकांना अन्नदाते समजत. तेही  स्वतःची गुणवत्ता क्वालिफिकेशन असताना. 1985 ते 1990 हा काळ खडतरच गेला. आजवर अनेक गावे आणि कॉलेजेस बदलली आणि येथे प्राचार्य बदलण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे लागले. 1990 ला कायम झालो. 1980 ला सुरू केलेली पीएच काम तेही 1990 ला संपलं पीएच डी अवॉर्ड झाली. विद्यापीठाचे पत्र पारस ला गेले तेथून ते री डायरेक्ट होऊन कन्नडला आले. मग मला कळालं आपलं पिएच.डी. झालं. सहकारी म्हणायचे जर आता शांत व्हा आपण विद्वान झाला पीएच.डी झालात. तर मी त्यांना उत्तर देत होतो माझ्या बोलण्याला, माझ्या शिव्यांना वेटेज यावं म्हणून मी पीएचडी केली. कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे मला पगारात कोणताही फायदा नव्हता. एक संशोधनाची काम करण्याची इच्छा आणि लागलेली समाधी यातून ते काम दहा वर्षात पार पडलं. प्रबंध पाच प्रति टाईप करायचा औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या एका क्लर्क ला ते काम दिलं काटछाट करून सारं दोन खंडात साधारणता पंधराशे पानात ते सारं काम बसवलं बाकी वजा केलं टायपिंगचा खर्च प्रचंड झाला आधी टाईपरायटर होते दोन स्ट्रोक मध्ये सारखं टाईप करावं लागलं त्याचा पेमेंट करण्यासाठी बायकोची लग्नाची पोत मोडावी लागली. अशावेळी बायकोची अन् आईची मनाची घालमेल व्हायची. एवढ्या खर्चात शेतात विहीर होईल मग विहीर करायची की पिएच.डी.चा प्रबंध छापायचा हा त्यांना पडलेला हा प्रश्न ते मला पुन्हा पुन्हा विचारीत. नोकरी दरवर्षी  अगेन्स्ट बॅकलाग होती. प्राचार्यांनी ८५ पासून तर 90 पर्यंत दर वर्षी मला टर्मिनेट केलं. शेवटी औरंगाबादला शिक्षण उपसंचालकाकडे गेलो. त्यांना जाब विचारला असताना मी टेम्पररी, माझ्यामागे आरक्षण, अंन जे बि.एड. नाहीत . अशांना आपण कायम करता भाग एक वर घेता यामुळे माझ्या घरात आरक्षणा विरोधात वातावरण झालाय आणि आपण याला जबाबदार आहात मी न्यायालयात जाईल. तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्या संस्थाचालकांनी आणि प्राचार्यांनी मला तसं सांगितलं म्हणून मी तसं केलं. त्यांना बाकी विषयाच्या ओपनच्या पोस्ट भरून घ्यावयाच्या होत्या म्हणून, नेहमी दरवर्षी इंग्रजीवर बॅकलाग ठेवला. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मला भाग दोन वरचे  घेतलेले नाव भाग एक वर घेतले. हे त्या वर्षाचं दुसरा॑दाच अप्रूव्हल. कायम केल्याचं, अप्रूव्हल माझ्या हाती दिलं. दहा वर्षे चालणार तात्पुरत्या नोकरीचा काम संपलं होतं. नोकरीची हमी आता आली होती. समाधान होतं. 

     आदिवासीं संशोधन आणि लढा:- आजूबाजूला डोंगर भटकंती सुरूच होती. वनसंपदेचे निरीक्षण अभ्यास जंगलात असलेल्या जुन्या पायवाटा मंदिर गुहा किल्ले हे भटकंती सुरू होतीच. त्यात आता आणखी वाढ झाली. या जंगलातील आदिवासी भील आणि ठाकर यांच्यात रमलो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ही पोर का शिकत नाहीत याची कारणे पाहिली. कारण होतं त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील आजवर ती दिली जात नव्हती. बातमी दिली, पत्रव्यवहार केला पुण्याला टी.आर.टी.आय. शी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की औरंगाबाद विभागात आदिवासी नाहीतच. मग मी आदिवासी विभागाची संशोधन  छात्रवृत्तीची जाहिरात पाहिली. मला आधी अजिंठा डोंगर परिसरातील भिल्लांची बोली यावर संशोधन छात्रवृति मंजूर झाली. दोन वर्षात भिलांच्या बोलीवर भाषा शास्त्रीय प्रबंध टीआरटीआयला सादर केला. दोन वर्षात मला दहा हजार छात्रवृत्तीचे  मिळाले् पीएडीनंतर रिकामपणाचा अवकाश अशा पद्धतीने भरून निघाला. आदिवासी ठाकर यांना जात प्रमाणपत्र प्रयत्न करूनही मिळत नव्हते म्हणून पुन्हा जाहिरातीला उत्तर देत दुसऱ्यांदा या विभागाची संशोधन छात्रवृति मिळवली. अजिंठा डोंगर परिसरातील आदिवासी ठाकर यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन असा प्रबंध टीआरटीआयला सादर केला. त्यांचा पोशाख, सामाजिकजीवन, सांस्कृतिक जीवन, बोली, शैक्षणिक जीवन आर्थिक जीवन धार्मिक जीवन यावर विस्ताराने माहिती दिली. आयुक्त, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, यांनी शासनाच्या  पत्राशिवाय जात प्रमाणपत्र द्यायला आणि व्हॅलिडीटी द्यायला नकारच दिला.  प्रकल्पाधिकारी, तलाठी, तहसीलदार, एस डी एम या सर्व कार्यालयांना भेटी दिल्या. मात्र जात प्रमाणपत्राचा प्रश्न मिटला नाही. ठाकरवाडी ला इतर भागातील आदिवासींचे लोकप्रतिनिधी आदिवासी मंत्री आमदार खासदार गावीत पिचड, बरोडा, दरोडा, गांगड ई. आदिवासी आमदार खासदारांना मेळाव्यांना बोलवून येथल्या आदिवासींचा प्रश्न पुन्हा पुन्हा मांडला. मात्र मेळावे होत गेले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आदिवासींचे लोकप्रतिनिधी यांनी आदिवासींची दखलच घेतली नाही.  ( all photos of officer's visit to tribal village are attached in photo gallery  )

      आदिवासींना जात प्रमाणपत्र मिळवून देणे ,शिक्षणाच्या प्रवाहात आणन  ही कामे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील असतात. आदिवासींना व्यवहार कळू न देणे, अडाणी ठेवणे हे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या वा प्रस्थापितांच्या फायद्याचे असते. आदिवासींचे मेळावे, सामूहिक विवाह, लग्न म्हणजे विवाह या खर्चांना फाटा देणे , त्यांना व्यसनाधीनते पासून दूर करणे, या बाबी मध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रस्थापितांशी थोडं शत्रुत्व येते. अन ते आलेही. त्यांना जात प्रमाणपत्र मिळालीत तर त्यांना घर, शेती, पत्रे, सिंचनाची व्यवस्था फुकट मिळेल. मग ते शेती करायला लागले तर आपल्या शेतात कोण काम करणार ? ही चिंता त्यांना ग्रासत असते. त्यांची मुलं जर शिकली तर त्यांची मुलं साहेब बनून आपल्या मुलांवर राज्य करतील हे चिंता त्यांना ग्रासत असते. त्यामुळे प्रस्थापित ज्यांचा नेहमी संपर्क शासकीय अधिकाऱ्यांशी असतो ते या आदिवासींना आदिवासी म्हणून मान्य करायला आणि सवलती द्यायला तयारच नसतात. त्यामुळे यांना शासकीय योजनांचा सारा लाभ टाळला जातो. ते अडाणी असल्यामुळे सारी वनोपजे  मध, कोंबड्यांची अंडी, कोंबड्या डिंक, गोडंबी, लाकडे, तेंडू पत्ता इत्यादी प्रस्थापित लोक त्यांच्याकडून लुटून नेतात, कवडीमोल भावाने घेतात. यामुळे प्रस्थापितांचा रोष मला ओढून घ्यावा लागला. 2003 यावर्षी आदिवासींचा रस्ता रोको झाला होता. एका मराठा शेतकऱ्याने आदिवासी युवकाचा गोळ्या घालून खून केल्यामुळे खुन्याल अटक करावी यासाठी तो रस्ता रोको होता.  आदिवासींना यापासून परावॄत करावं म्हणून माझ्यावर दडपण आलं. मी ते जुगारून दिलं. त्यामुळे रस्ता रोकोच्या वेळी लाठी मार, गोळीबार, अश्रुधूर यांचा वापर झाला. आणि माझ्यावर मी तिथे हजर नसताऺनाही मी आदिवासींना भडकवून 40 पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न  अशी केस करण्यात आली 2003 ते 2005 पर्यंत कोर्ट कचेरी यांच्यात गेली . या प्रकरणात माझ्यासह शंभर आदिवासींना गोवलेले होते. सेशन कोर्टात औरंगाबादला दरवेळी जावे लागले. तेही शंभर आदिवासींना सोबत घेऊन. साधारणता 21 तारखा पडल्यात. पाच न्यायाधीश बदललेत. 2005 ला सारे केस मुक्त झालोत.  मात्र कुटुंबात आदिवासी विरोधात एक कटुता निर्माण झाली. दोन्ही मुली इंजिनिअरिंगला, अटक झाली असती, शिक्षा झाली असती , तर नोकरी गेली असती . पेन्शन गेलं असतं. मुलींचे शिक्षण संपलं असतं सारं कुटुंब उध्वस्त झालं असतं. ही टाऺगती तलवार साऱ्या कुटुंबावर होती.  या प्रकरणामुळे समाज आणि  माझे सह शिक्षक सहकारी यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. हा दुरावा आदिवासी आणि मी यांच्यातही निर्माण झाला. आदिवासींच्या या मुख्य कामापासून, जात प्रमाणपत्राचा लढा यापासून थोडा दूर गेलो. 2010 मध्ये नागपूरहून आदिवासी आयुक्त श्री व.सू. पाटील हे जात पडताळणी विभागाचे अध्यक्ष तथा उपायुक्त म्हणून औरंगाबादला बदलून आलेत.  गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून चा माझ्या पत्र व्यवहाराची दखल घेत त्यांनी मला फोन केला, चर्चा केली प्रत्यक्ष कन्नडला आलेत, प्रत्यक्ष आदिवासी गावांची पाहणी केली आणि औरंगाबादला वाल्मी येथे महाराष्ट्रातील  आदिवासी विभागाच्या जात पडताळणीच्या आठही दक्षता पथकांच्या शंभर अधिकाऱ्यांची कार्यशाळा ठेवली. त्यात मला निमंत्रित केले. मी विस्ताराने या परिसरातील आदिवासींची सामाजिक सांस्कृतिक मांडणी प्रोजेक्टवर साऱ्यांना दाखवली. सर्वांनी ते आदिवासीच आहेत हे मान्य केले. त्यानंतर कार्यशाळेचा भाग म्हणून शंभर अधिकाऱ्यांना दोन बसेस ने या आदिवासी खेड्यांना भेट देण्यासाठी नेण्यात आले. तेथे आदिवासी परंपरा बोली पोशाख घरे इत्यादी पाहून सर्वांनी मान्य केलं की हे आदिवासीच आहेत. त्यानंतर जागेवरच आठ विद्यार्थ्यांना गाडीत बसून त्यांच्या व्हॅलिडिटी च्या फाईल, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल मार्फत माझ्याकडे सुपूर्त केल्या. त्यानंतर 800 जात प्रमाणपत्र दिली गेलीत. व्हॅलेडीटी केली गेली. मात्र स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात ज्या समाजाला एकही जात प्रमाणपत्र दिले गेले नव्हतं अशांना आदिवासी ठरवून 800 जात प्रमाणपत्र या अधिकाऱ्याने दिलीत म्हणून उर्वरित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर 2013 मध्ये मी आदिवासी ठाकर डॉट कॉम या नावाची वेबसाईट आणि आदिवासी ठाकर समाजशास्त्री अभ्यास हे पुस्तक प्रकाशित केले जेणेकरून साऱ्या जगाला या परिसरातील आदिवासींची ओळख व्हावी व त्यांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे व.सू. पाटलांवर केलेले आरोप हेही पुसले जावेत. व .सू. पाटील कोर्टात जिंकले त्यानंतर ते हार्ट अटॅक ने वारलेत. पुढे शासनाने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कायम ठेवून अनेक चौकशी नेमून दिलेल्या जात प्रमाणपत्राची पुनर पडताळणीचा तमाशा सुरूच ठेवला. 2017, 18 मध्ये कन्नडचे आमदार माननीय हर्षवर्धन जाधव यांना मी कन्नड तालुक्यातील या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी लक्षही घातले. आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेत आदिवासी ठाकर, जळगाव घाटचे तिरमल, पिशोर भिलदरीचे राजपूत या आदिवासींची दखल घ्यावी आणि त्यांना जात प्रमाणपत्र मिळावेत म्हणून प्रश्न उपस्थित केला. मंत्री गटाची बैठकीतली वेळ यासाठी मागून घेतली. मला आमदार हर्षवर्धन जाधव यांनीमंत्रालयात चंद्रकांत दादा पाटील आदिवासी मंत्री सावरा यांच्यासमोर डेमो सादर करण्याची संधी दिली. त्यावेळी तहसीलदार कलेक्टर एचडीएम तलाठी सारे उपस्थित होते. जागेवर या साऱ्या आदिवासींना त्वरित प्रमाणपत्र वितरित करावीत हे आदेश देण्यात आले. त्यानंतर एक दोन कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 5000 आदिवासी ठाकर यांना जात प्रमाणपत्रे आणि व्हॅलिडीटी वितरित करण्यात आल्या. आदिवासींना जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचा लढा 2018 मध्ये संपला आता सारे आदिवासी सामाजिक आणि शैक्षणिक प्रवाहात येतील हे अपेक्षा धरूया.

           आदिवासींचा जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचा हा लढा साधारणता 1985 ते 2018 या काळात झाला. असाच लढा मला 1980 पासून तर ते 1997 पर्यंत अहिराणीच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी, त्यांच्या प्रकाशनसाठी द्यावा लागला. 80 ते 90 या काळात पिएच.डी.चे काम सुरू होतं तरीही याच काळात शब्दकोश, म्हणी कोश, सचित्रकोश, यांचेही काम त्याचवेळी सुरू होतं. या साऱ्या पुस्तकांच्या प्रकाशनसाठी अनेक प्रयत्न केलेत तोही वृत्तांत पुढे देत आहे

   (  मी माझ्या संबंधित उपरोक्त माहिती फेसबुकला टाकली असता बऱ्याच कॉमेंट झाल्यात. ही माहिती मी माझ्या वेबसाईटसाठी टाकली होती . पण फेसबुक वरील कॉमेंट्स सुद्धा मी यात समाविष्ट करीत आहे. विशेष म्हणजे ही माहिती अजून बरीच अपूर्ण आहे सवडीने ती पूर्ण करेल. ( Who are interested about my life journey please read my Marathi Novel 1-Pranjal 2 Sharngat - Prapatti . both are loaded in Marathi Books on same website. ) 

फेसबुक  कॉमेंट      .

Ashok Shinde

धडपडणारे शिक्षक,समाजसेवक,लेखक,अहिराणी शब्दकोशकार सुर्यवंशी सराच्या कर्याला नतमस्तक ?!!

Prabhakar Nikum

एक शिक्षक

भाषेसाठी, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय काय करु शकतो, एकहाती लढाई लढून त्यात यशस्वी होतो याची ही चित्तथरारक कहाणी आहे. तुमच्या कष्टाला सलाम.सर याचे पुस्तक कराच.

Hukumchand Pawar

अत्यंत प्रेरणादायी प्रवास.. पण आमच्या वहिनी साहेबांची साथ संगत आयुष्यात मोलाची आहे.. Great things come to those who wait and see. आपण शेवट पर्यंत प्रयत्न करत राहिलात.. अजून ही चालू आहे.. keep up the good work 

Deepak Shinde

खूपच प्रेरणादायी आहे सर तुमचा जीवन कार्य काळ,

Pralhad Lulekar

तुमचे संशोधन माहिती आहे .. तुमचा अभ्यास माहिती आहे .. संशोधन क्षेत्रात खूप चांगले काम केले .. मात्र प्रत्यक्ष आदिवासींमध्ये जाऊन काम केले .. हे माझ्यासाठी नवीन आहे .. असो

सर्वच शिक्षकांची ही भूमिका असती तर देश पूर्णपणे बदलला असता .. जाती धर्माच्या चौकटीत अडकून एकमेकांचे जीव घेतले नसते ..

Vinod Borse

एक प्रेरणादायी प्रवास...

Prashant Bhagwan Vispute

प्रेरणादायी संघर्ष आहे आपला

कुणबीमराठा समाज मराठवाडा

अदिवासी बांधवासाठी स्तुत्य कार्य.

परंतु त्याच बरोबर विस्तापित मराठा शेतकरी समाजाला मराठा तत्सम कुणबी म्हणुन ओबीसीत समावेश करण्यासाठी अधिक प्रयत्न अपेक्षित आसेल

परंतु ओबीसीत समावेशाचा प्रयत्न होणार नाही कारण अनेकांना पुरोगामीत्व आडवे येते.

सध्या अनेक समाज बांधव सजग झालेले आसुन नियम,अधिनियम,शासन निर्णय,मा.न्यायालयीन निर्णय जाणुन स्वातंत्र्य पुर्व (घटनापुर्व )काळातील मुबई प्रांतातील महसुली नोंदी व इतर विभागातील नोंदी.इ.च्या पुराव्यानुसार मराठा समाज मराठाकुणबी ओबीसी धारक आहेत.

Ramesh Suryawanshi

कुणबीमराठा समाज मराठवाडा हा प्रश्न मी चंद्रकांत दादा पाटलांसमोर मंत्रालयात 2018 मध्ये सोबत गॅझेट घेऊन मांडला. मराठवाड्यामध्ये कुठेही कुणबी नाहीत असे म्हणतात .पण इंग्रजांच्या काळातला गॅझिटिअरमध्ये वैजापूर पैठण गंगापूर कन्नड या सर्व तालुक्यांमध्ये संख्या दिलेली आहे. हे त्यांना मी सह प्रमाण सांगितले .पण राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा हसून ते मोकळे झाले. त्यांना म्हटलं इंग्रजांच्या काळात जर हे सारे कुणबी होते स्वातंत्र्यानंतर एका रात्रीत सगळे मरून मराठे कसे झाले ? मग कुणबी गेले कुठे आणि मराठे आले कुठून याची न्यायालयीन चौकशी करा ! हसण्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही.!!!

                 दुसरी बाब अशी की कन्नडला रथयात्रा होती आपल्या मराठा सेवा संघाची 2003 मध्ये जुलै महिन्यात रथाचा रथयात्रा माननीय पुरुषोत्तम खेडेकरांसोबत सारं नियोजन मी आणि माझ्या मित्रांनी जैन कॉम्प्रेस मध्ये केलं होतं सर्वांना पुरणपोळीचे जेवण दिलं होतं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दुर्दैवाने मराठ्यांनी माझ्यावर असून 307 पासून अनेक कलम लावून केस केली होती तरीही त्यांच्या बुद्धीची किव करीत माझं काम काही थांबलं नाही. आरोप करण्यापूर्वी मला समजून घ्यावे लागेल

  • Ramchandra Kalunkhe

    अत्यंत महत्त्वाचे कार्य आपण केले.​

  • Jagannath Mohite

    आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे काम आपण केलं .​

  • Sanjeev Kothawade

    मातृभूमीच्या सुपुत्रची आयुष्याची जीवन कहाणी समजली .

    संजीव कोठावदे शिंदाडकर ( नासिक ​

  • Subhash Kakde

    सर तुम्ही अादिवासी बांधवासाठी जे काम करत आहात व केलेले आहे या तोड नाही...

    जातीच्या पलिकडे जाऊन माणुस हा केंद्र बिंदु मानुन तुम्ही जे केलेले आहे त्या चिवट सेवाभावी कार्याला सलाम..

    नाहि तर मराठा आरक्षणाचा विषय आला की खुप मोठे ,जागतिक दर्जाचे विचारवंत कुपमंडूक होतांना बघावे लागते आहे...

  • Ramesh Suryawanshi

    • Subhash Kakde कुणबीमराठा समाज मराठवाडा हा प्रश्न मी चंद्रकांत दादा पाटलांसमोर मंत्रालयात 2018 मध्ये सोबत गॅझेट घेऊन मांडला. मराठवाड्यामध्ये कुठेही कुणबी नाहीत असे म्हणतात .पण इंग्रजांच्या काळातला गॅझिटिअरमध्ये वैजापूर पैठण गंगापूर कन्नड या सर्व तालुक्यांमध्ये संख्या दिलेली आहे. हे त्यांना मी सह प्रमाण सांगितले .पण राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा हसून ते मोकळे झाले. त्यांना म्हटलं इंग्रजांच्या काळात जर हे सारे कुणबी होते स्वातंत्र्यानंतर एका रात्रीत सगळे मरून मराठे कसे झाले ? मग कुणबी गेले कुठे आणि मराठे आले कुठून याची न्यायालयीन चौकशी करा ! हसण्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही.!!!

      दुसरी बाब अशी की कन्नडला रथयात्रा होती आपल्या मराठा सेवा संघाची 2003 मध्ये जुलै महिन्यात रथाचा रथयात्रा माननीय पुरुषोत्तम खेडेकरांसोबत सारं नियोजन मी आणि माझ्या मित्रांनी जैन कॉम्प्रेस मध्ये केलं होतं सर्वांना पुरणपोळीचे जेवण दिलं होतं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दुर्दैवाने मराठ्यांनी माझ्यावर असून 307 पासून अनेक कलम लावून केस केली होती तरीही त्यांच्या बुद्धीची किव करीत माझं काम काही थांबलं नाही. आरोप करण्यापूर्वी मला समजून घ्यावे लागे

    • Subhash Kakde

    • सर आपण प्रमाणिक प्रयत्न केले व कितीही अडथळे आले तरी भविष्यात करत

      राहाल या बद्दल खाञी वाटते...

      मी दुसर्या विचारवंताविषयी बोलत होतो...

      ते खुप मोठे आहेत पण मराठा आरक्षनाचा विषय आला कि सत्य त्यांना पचत नाही ..

      कुपमंडूक होतात..

    • Somnath Dale

    • आपण जे काम आदिवासी बांधवांसाठी केलं ते स्पृहणीय आहे. दुसरे आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जे कष्ट घेतले ते पण उल्लेखनीय आहे.

bottom of page